लखनऊ – भाजपच्या खासदार प्रियंका रावत यांनी बाराबंकीचे अपर पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांना भर पत्रकार परिषदेत चामडी सोलून काढण्याची धमकी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बरीच ‘मलई’ (पैसे) खाल्ली आहे. आता भाजपचे सरकार आहे. जर या लोकांनी कामे केली नाहीत तर ‘मलई’सह त्यांची चामडीही सोलून काढेन, अशी धमकी खासदार रावत यांनी दिल्यानं उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली आहे.
खासदार रावत यांनी पत्रकार परिषदेत बाराबंकीचे अपर पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानंजय सिंह यांचे थेट नाव घेतले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. जे काम करतील तेच या जिल्ह्यात राहतील. आम्ही सगळ्यांचा रेकॉर्ड तपासणार आहोत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार रावत यांनी पोलीस अधिकारी सिंह यांना रामनगर परिसरातील हत्या प्रकरणाशी संबंधित दूरध्वनी केला होता. मात्र, सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने उत्तरे दिली. मी पोलीस अधिकारी आहे. माझे काम मला माहित आहे, असे उद्धट उत्तर सिंह यांनी दिल्याचा रावत यांचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास खासदार रावत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक वैभव कृष्ण यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.