HW News Marathi
देश / विदेश

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित व्यवस्थापन मंडळास सहकारी बँकांच्या संघटनांचा तीव्र विरोध

मुंबई | रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी आणलेल्या प्रस्तावित व्यवस्थापन मंडळास (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) सहकार भारतीचा तीव्र विरोध असून देशभरातील सहकारी बँकांच्या संघटनांनी यास पूर्णपणे विरोध दर्शविला आहे. सहकार भारतीने देशभरातील सर्वच सहकारी बँकांच्या संघटनांना एका व्यासपीठावर आणले असून सहकार भारतीसह सर्व बँक संघटनांनी रिझर्व्ह बँकेच्या या धोरणांचा सर्व स्तरावर ठाम विरोध करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने 24 जुलैपूर्वी सदरच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया मागवल्या होत्या व त्यावर सहकार भारतीसह सर्वच संघटनांनी तसेच असंख्य बँकांनी सदरचा प्रस्ताव रद्द करावा अशी स्पष्ट मागणी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील सुमारे 100 नागरी बँकांना राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने सहकार भारतीने नुकतेच एकत्र केले होते व यावेळी देखील या प्रस्तावास तीव्र विरोध करण्याचेच ठरविण्यात आले आहे. नागरी सहकारी बँकांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची विशेष उल्लेखनीय कामगिरी आहे. आज भारतात 1562 सहकारी बँका असून महाराष्ट्रात त्यापैकी 502 आहेत तर सहकारी बँकांकडील एकूण व्यवसाय सुमारे 15 लाख कोटींच्या घरात आहे.

सहकारी बँकांचे सध्याचे संचालक मंडळ हे सभासदांमधून लोकशाही मार्गाने निवडून येते. संचालक मंडळात बँकिंग तज्ञ, चार्टर्ड अकौंटंट अशा किमान दोन अनुभवी व्यक्ती असण्याची अट यापूर्वीच सहकारी बँकांनी स्विकारली आहे. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ असण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्याचबरोबर कायद्यातील आणि बँकांच्या उपविधीमधील तरतूदींमध्ये अशा स्वरुपाचा कोणताही विषय नसल्याने कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे, मात्र रिझर्व्ह बँक परस्पर कायद्याला डावलून अशा पध्दतीचा प्रस्ताव आणत आहे. संचालक मंडळाशिवाय व्यवस्थापन मंडळ आणण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेला करता येणार नाही. या प्रस्तावामुळे नागरी बँकांमध्ये कामकाज करतांना प्रचंड अडचणी येणार असून निर्णय प्रक्रियेत दिरंगाई होण्याची शक्यता आहे. सध्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेबरोबरच राज्य सरकारचे सहकार खाते असे दुहेरी नियंत्रण आहे. त्यामुळे याशिवाय स्वतंत्र व्यवस्थापन मंडऴ असणे अजिबात आवश्यक नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, नॅफकॅबचे राम बाबू शांडिल्य, राज्य बँक फेडरेशऩचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य बँक असोसिएशनचे अध्यक्ष शरद मैद, संचालक संजय भेंडे, सहकार भारतीचे अर्बन बँक राष्ट्रीय प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला व राज्याचे अर्बन बँक प्रकोष्ठ प्रमुख सुभाष जोशी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रियकराने प्रेयसीला बाथरूममध्ये जिवंत जाळले.

News Desk

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याची आणीबाणीची पोस्टरबाजी

News Desk

…असे समजले बेअर ग्रिल्सला मोदींचे हिंदी

News Desk