पुणे । ‘भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.
युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.
जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश
जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना प्रधानमंत्र्यांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक
उपमुख्यमंत्री म्हणाले की, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आताची भू-राजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.
अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे लेखन झालेल्या पुस्तकाचा तितक्याच सोप्या आणि सुंदर भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. विविध समूहांना भारताचा विचार या पुस्तकातून समजेल. जागतिकीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्टपणे कळली पाहिजे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो म्हणून त्याची माहिती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे असून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.
क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त – डॉ. एस. जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, जागतिकीकरण आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारत मार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.
परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्त्वाची सूत्रे
स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.
सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे
चांगल्या परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.
चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारित धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चौथाईवाले यांनी यावेळी ‘भारत मार्ग’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. पररराष्ट्र धोरणाविषयी अत्यंत सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.आफळे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत ६३० पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.