HW Marathi
देश / विदेश

एका व्यक्तीच्या खोट्या, तथ्यहीन आरोपांमुळे मला पदावरून हटविले !

नवी दिल्ली | “केवळ एका व्यक्तीच्या खोट्या आणि तथ्यहीन आरोपांमुळे मला पदावरून हटविण्यात आल्याचा आरोप आलोक वर्मा यांनी गुरुवारी रात्री केला आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. आलोक वर्मा यांना गुरुवारी (१० जानेवारी) सीबीआयच्या संचालक पदावरून हटविण्याचा निर्णय सिलेक्ट कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या सिलेक्ट कमिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुचविलेले न्यायाधीश ए. के. सिकरी आणि विरोधी पक्ष नेते मलिक्कार्जुन खरगे यांचा समावेश होता.

सीबीआय ही भ्रष्टाचारांच्या मोठ्या प्रकरणांची चौकशी करणारी एक महत्वाची संस्था असल्याने सीबीआयची ही स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे. सीबीआयचे काम हे कोणत्याही बाह्य दबावाशिवाय चालले पाहिजे. मी होतो तेव्हा मी कायमच सीबीआयचा प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा प्रामाणिकपणाच नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे देखील आलोक वर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.

सिलेक्ट समितीच्या बैठकीत भ्रष्टाचाराचा त्याचप्रमाणे आपले कर्तव्य योग्यरीत्या न बाजवल्याचा आरोप करत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना गुरुवारी (१० जानेवारी) संचालकपदावरून हटविण्यात आले आहे. २-१ अशा बहुमताने वर्मा यांना हटविण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीआयच्या संचालकपदी एम. नागेश्वर राव यांची नेमणूक

सीबीआयच्या संचालकपदावरुन हटविण्यात आल्यानंतर आलोक वर्मा होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि अग्निशमन सेवा महासंचालक म्हणून काम सांभाळतील. त्याचप्रमाणे एम. नागेश्वर राव यांची सीबीआयच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Related posts

#PulwamaAttack : हा जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील जवानांवरील सर्वात मोठा हल्ला

News Desk

चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयचे लूकआऊट नोटीस जारी

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये मिनिबस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू

अपर्णा गोतपागर