गौरी टिळेकर | भारताच्या अंतराळ युगाचे जनक विक्रम साराभाई! १२ ऑगस्ट १९१९ साली अहमदाबादमधील एका अत्यंत संपन्न कुटुंबात विक्रम साराभाईंचा जन्म झाला. साराभाईंना लहानपणापासूनच गणित आणि भौतिकशास्त्रात प्रचंड रस होता. साराभाईंनी भारतीय संशोधन कार्यात अत्यंत भरीव कामगिरी केली. १९३७ साली १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात गेले. परंतु तेवढ्यातच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि त्यांना भारतात परतावे लागले. परंतु दुसरे महायुद्ध संपल्यानंतर म्हणजे १९४५ साली ते ब्रिटनला परत गेले आणि त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.
१९४७ साली कॉस्मिक रे इन्वेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लैटिट्यूडस वर संशोधन करून डॉक्टरेक्ट पदवी संपादन करून ते भारतात परतले.भारतात परत येऊन प्रथम त्यांनी अहमदाबाद येथे भौतिक संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हि केवळ सुरुवात! पुढे त्यांनी भारतीय अवकाश संशोधनात अत्यंत भरीव अशी कामगिरी केली.त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. भारताचा पहिला अंतराळ उपग्रह ‘आर्यभट्ट’ १९७५ साली अवकाशात सोडला गेला त्या उपग्रहाची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. ‘आर्यभट्ट’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली.
ज्या काळात विक्रम साराभाईंनी भारतीय संशोधनात काम केले त्या काळात संशोधनासाठी आपल्या देशाकडे विशेष आर्थिक तरतूद नव्हती. परंतु तरीही त्यांनी शास्त्रज्ञांवर ह्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होऊ दिला नाही. उलट अशा परिस्थितीत त्यांनी शास्त्रज्ञांना अधिक प्रोत्साहन दिले आणि जिद्द ठेऊन काम करण्यास सांगितले. डॉ. अब्दुल कलाम यानीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले. साराभाईंनी स्वतः स्वप्न पहिली, इतरांनाही स्वप्न पाहायला शिकवली आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफाट मेहनत घेतली. एक प्रभावी, सकारत्मक, जिद्दी, महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्व म्हणून ते कायमच लोकांच्या समरणात राहिले.डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.