HW News Marathi
देश / विदेश

Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत लिहलेला लेख. यंदा देशात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 150 जयंती साजरी होत आहे या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी लेख लिहला आहे. या लेखाच्या माध्यमातून बापूंच्या स्वप्नपूर्तीसाठी भारत कसा एकवटला यावर पंतप्रधानांनी भाष्य केले आहे. “वैष्णव जन तो तेने कहीये जी, पीर परायी जाने रे ” या बापूंच्या आवडत्या ओळी होत्या. ज्याला इतरांच्या वेदनांची जाणीव होते, तो चांगला आत्मा असतो, असा या ओळींचा अर्थ आहे. याच ओळींमधून त्यांना इतरांसाठी जगण्याची प्रेरणा मिळाली. आज आपण 1.3 अब्ज भारतीय, ज्या भारतासाठी बापूंनी आपले आयुष्य वेचले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. असेही मोदी या लेखात म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदींनी लिहलेला लेख

आज आपण आपल्या प्रिय बापूंच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा शुभारंभ करत आहोत. समानता, सन्मान, समावेश आणि सक्षमीकरणाने परिपूर्ण असे आयुष्य जगू इच्छिणाऱ्या जगातील लक्षावधी लोकांसाठी आजही बापू आशेचा किरण आहेत. मानवी समाजावर त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे.

महात्मा गांधींनी आपल्या शब्दांनी आणि प्रेरणेने, विचारांनी आणि कृतीने अवघा भारत देश जोडला. सरदार पटेल यांनी म्हटले होते की, “भारत हा विविधतेचा देश आहे. आमच्या देशाइतकी विविधता अन्यत्र कुठेही नाही. जर कोणी एका व्यक्तीने या देशातील सर्वांना एकत्र आणले असेल, लोकांना विविधतेतून बाहेर पडून विचार करायला प्रवृत्त केले, वसाहतवादाविरूद्ध लढायला शिकवले असेल आणि जागतिक मंचावर भारताच्या प्रतिष्ठेत भर घातली असेल तर ते महात्मा गांधी होते. त्यांनी हे केवळ भारतात केले नाही तर दक्षिण आफ्रिकेतही केले. बापू हे काळाच्या पुढे पाहू शकत होते, त्यांना फार पुढची कल्पना आधीच येत असे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहिले.”

२१ व्या शतकात महात्मा गांधीजींचे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत, तितकेच कालसुसंगत आहेत. जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे समाधान त्यांच्या विचारांमध्ये आहे. दहशतवाद, कट्टरतावाद, अतिरेकीवाद आणि तिरस्कार अशा समस्या आज देशांमध्ये आणि समाजात दुहीचे वातावरण निर्माण करत असताना महात्मा गांधीजींच्या शांती आणि अहिंसा या तत्वांमध्ये आजही मानवतेच्या बळावर सर्वांना बांधून ठेवायचे सामर्थ्य आहे.

असमानतेने भरलेल्या आजच्या या जगात बापूंची समानता आणि समावेशक विकासाची तत्वे, लक्षावधी वंचितांच्या आयुष्यात समृद्धीचे युग आणण्यास समर्थ आहेत. हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे चर्चेचे मध्यवर्ती मुद्दे झाले असताना, या युगातही जगासाठी गांधीजींचे विचार अनुकरणीय आहेत. दशकापेक्षा जास्त काळापूर्वी १९०९ साली त्यांनी जगाच्या गरजा आणि मानवी लोभ या गोष्टींमधला फरक स्पष्ट केला होता. या दोन्ही विचारसरणीच्या समूहांना त्यांनी नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करायचे तसेच संयम आणि दयाळूपणाचे आवाहन करत, स्वत:च्या उदाहरणावरून आदर्श घालून दिला. आपल्या भवतालचा परिसर स्वच्छ असावा, यासाठी त्यांनी स्वत:चे शौचालचही स्वच्छ केले. पाण्याचा अपव्यय टाळावा, यासाठी ते प्रयत्नशील राहिले आणि जेव्हा ते अहमदाबादमध्ये होते तेव्हा त्यांनी अस्वच्छ पाणी साबरमती नदीत मिसळून नदी प्रदुषित होऊ नये, याची खबरदारी घेतली.

काही काळापूर्वी महात्मा गांधीजींनी लिहिलेला खुसखुशीत, व्यापक आणि संक्षिप्त मजकूर माझ्या वाचनात आला. १९४१ साली गांधीजींनी “रचनात्मक कार्यक्रम : त्याचा अर्थ आणि स्थान” या मजकूराचे लेखन केले. १९४५ साली, जेव्हा स्वातंत्र्यांची चळवळ ऐन भरात होती, तेव्हा त्यांनी या मजकुरात काही बदल केले. या दस्तावेजात बापूंनी ग्रामीण विकासापासून कृषी क्षेत्राचे सक्षमीकरण, स्वच्छतेच्या व्याप्तीत वाढ, खादीला प्रोत्साहन, महिलांचे सक्षमीकरण तसेच आर्थिक समानता अशा वैविध्यपूर्ण बाबींचा समावेश केला होता.

इतर सर्व भारतीयांनी गांधीजींच्या या रचनात्मक कार्यक्रमाचे वाचन करावे (हा दस्तावेज ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध आहे) आणि आपण बापूंच्या स्वप्नातील भारताची कशाप्रकारे उभारणी करू शकतो, यासाठी त्यातून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मी करतो. रचनात्मक कार्यक्रमातील अनेक विषय आजच्या काळाच्या दृष्टीने सुसंगत आहेत. सात दशकांपूर्वी बापूंनी व्यक्त केलेले आणि अजूनही अपूर्ण राहिलेले अनेक विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक सुंदर पैलू म्हणजे त्यांनी प्रत्येक भारतीयाला आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असल्याची भावना बहाल केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात, मग तो शिक्षक असो, वकील असो, डॉक्टर असो, शेतकरी असो, मजूर असो वा उद्योजक असो, या सर्वांच्या मनात स्वतःवरील विश्वासाची भावना जागवली. त्याचप्रमाणे आजही आपण गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्या सर्व पैलूंचा स्वीकार करू, अंगिकार करू. अन्नाचा शून्य अपव्यय किंवा अहिंसा आणि एकात्मतेच्या तत्त्वाचा स्वीकार अशा साध्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. भावी पिढ्यांना स्वच्छ आणि हरित पर्यावरण देण्यासाठी आपण कशाप्रकारे योगदान देऊ शकतो, याचा विचार करू शकतो. सुमारे आठ दशकांपूर्वी जेव्हा प्रदूषणाची समस्या आजच्या इतकी मोठी नव्हती, तेव्हाही महात्मा गांधीजींनी सायकलच्या वापराला सुरुवात केली होती. अहमदाबादमधील अनेक जण आजही गुजरात विद्यापीठापासून साबरमती आश्रमापर्यंत गांधीजींच्या सायकल प्रवासाच्या आठवणी सांगतात.

दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकांना सायकलच्या वापरापासून रोखणाऱ्या कायद्याविरुद्ध गांधीजींनी आंदोलन केल्याचे वाचल्याचेही मला आठवते. अत्यंत समृद्धी देणारा वकीली पेशा करत असतानाही गांधीजी जोहान्सबर्गमध्ये सायकलने प्रवास करत. जेव्हा जोहान्सबर्गमध्ये प्लेगची साथ आली, तेव्हा सर्वात जास्त प्लेगग्रस्त भागात गांधीजींनी सायकलवरून धाव घेतली आणि स्वतःला मदत कार्यात गुंतवून घेतले. ही प्रेरणा आज आपण दाखवू शकतो का? सणांचे दिवस जवळ आहेत. भारतभरातील नागरिक नवीन कपडे, भेटवस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर अनेक बाबींची खरेदी करत असतील. असे करताना गांधीजींनी दिलेली शहाणपणाची शिकवण आठवून बघा. आपल्या वागणुकीने आपण अनेक भारतीयांचे आयुष्य समृद्धीने उजळू शकतो, याचा विचार करा. भारतीयांनी तयार केलेल्या वस्तू, मग ते एखादे उत्पादन असो, भेटवस्तू असो किंवा खाद्यपदार्थ असो, ती खरेदी करून आपण आपल्या भारतीय बंधू-भगिनींना अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी मदत करू. आपण त्यांना कधीही पाहिले नसेल किंवा या पुढच्या आयुष्यात आपण त्यांना कधीही पाहणार नसू. मात्र अशाप्रकारे आपल्या भारतीय बंधू-भगिनींना आपण मदत करू शकलो, तर बापूंना आपला अभिमान वाटेल.

गेल्या चार वर्षांमध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून 130 कोटी भारतीयांनी महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मेहनतीमुळे आज स्वच्छ भारत मोहिमेला चार वर्षे पूर्ण होत असताना, उत्कृष्ट परिणाम देणारी ही एक व्यापक लोकचळवळ ठरली आहे. 85 दशलक्ष पेक्षा जास्त घरांमध्ये पहिल्यांदाच शौचालयांचे बांधकाम झाले आहे. 400 दशलक्ष पेक्षा जास्त भारतीय आता उघड्यावर शौच करीत नाहीत. चार वर्षांच्या अल्पावधीत देशातील स्वच्छतेची व्याप्ती 39 टक्क्यांवरून 95 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच साडेचार लाख गावे उघड्यावरील शौचमुक्त झाली आहेत.

स्वच्छ भारत मोहीम ही प्रतिष्ठा जपणारी आणि चांगले भविष्य निर्धारित करणारी मोहीम आहे. शौच करण्यासाठी दररोज सकाळी इतरांपासून स्वतःचा चेहरा लपवत आडवाटेला जाणाऱ्या कोट्यावधी महिला आणि स्वच्छतेअभावी असंख्य आजारांना बळी पडू शकणाऱ्या बालकांसाठी ही मोहीम म्हणजे एक वरदान आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान, राजस्थान मधून एका दिव्यांग बंधूने मला फोन केला. तो दोन्ही डोळ्यांनी पाहू शकत नव्हता, तरीही शौचालयामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या सकारात्मक बदलांबद्दल त्याने माहिती दिली. समाजात त्यांच्यासारखे अनेक बंधू आणि भगिनी असतील, ज्यांची उघड्यावर शौच करायला जावे लागत असल्यामुळे वाट्याला येणाऱ्या गैरसोयीपासून सुटका झाली असेल. त्यांच्याकडून मिळालेले आशीर्वाद माझ्या आयुष्यभर स्मरणात राहतील.

उत्साहाने भारलेल्या अनेक भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचे सुदैव लाभले नसेल. आपण देशासाठी प्राणांची आहुती देऊ शकत नाही, मात्र आपण देशासाठी जगू शकतो आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारताची उभारणी करण्यासाठी शक्य ते सर्व करू शकतो.

बापूंचे स्वप्न पूर्ण करण्याची एक मोठी संधी आज आपल्याकडे आहे. आपण स्वच्छतेसंदर्भात फार मोठा पल्ला गाठला आहे आणि येणाऱ्या काळात आपण या कामाची व्याप्ती आणखी वाढवू, असा विश्वास मला वाटतो.

“वैष्णव जन तो तेने कहीये जी, पीर परायी जाने रे ” या बापूंच्या आवडत्या ओळी होत्या. ज्याला इतरांच्या वेदनांची जाणीव होते, तो चांगला आत्मा असतो, असा या ओळींचा अर्थ आहे. याच ओळींमधून त्यांना इतरांसाठी जगण्याची प्रेरणा मिळाली. आज आपण 1.3 अब्ज भारतीय, ज्या भारतासाठी बापूंनी आपले आयुष्य वेचले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोकलामच्या वादात भारताचा विजय

News Desk

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून धमकी

News Desk