नवी दिल्ली | नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिदिंयांची आज (३१ जुलै) कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याविषयी चर्चा झाली. यावेळी विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही ज्योतिरादित्य सिंदिया यांनी दिली आहे.
करवीर छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत माधवराव सिंदिया हे अत्यंत जवळचे मित्र होते. श्रीमंत माधवराव सिंदिया यांचे १९४० साली ग्वाल्हेर येथे स्मारक उभारल्यानंतर त्याचे अनावरण छत्रपती महाराजांच्या शुभहस्ते व्हावे, यासाठी श्रीमंत माधवराव शिंदे यांचे पुत्र व ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज श्रीमंत जिवाजीराव सिंदिया यांनी शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना निमंत्रित केले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी स्मारकाचे अनावरण केले होते.
आजही छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरकर सिंदिया घराण्याचे मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत. नुकतीच केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांचे संभाजीराजे छत्रपती यांनी अभिनंदन केले. छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर विमानळास महाराजांचे नाव देण्याची मागणी यावेळी केली. २०१८ साली महाराष्ट्र शासनाने तसा ठराव करून प्रस्ताव दिला होता. मात्र, विद्यमान राज्य शासनाने पुन्हा एकदा तसा ठराव करून नव्याने प्रस्ताव पाठविल्यास लवकरच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
I called upon Shri Jyotiraditya Scindia, Minister of Civil Aviation to discuss the naming of Kolhapur Airport as “Chhatrapati Rajaram Maharaj Airport”.
We also discussed the crucial issue of night landing at the airport, lack of which is hindering the ongoing operations. pic.twitter.com/BksjEGtsjc
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 31, 2021
यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विमानतळाच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी केली. तसेच, लवकरच याबाबतीत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांचेसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.