HW News Marathi
देश / विदेश

सिद्धगंगा मठाचे अधिपती श्री. शिवकुमार स्वामी यांचे निधन

बंगळुरु | कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री. शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी (२१ जानेवारी) निधन झाले. श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात ८ डिसेंबरला ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी स्वामींच्या फुप्फुसात संसंर्ग झाला होता. त्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु श्री. शिवकुमार स्वामी यांनी वयाच्या १११ वर्षी सोमवारी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाची बातमी समजताच कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी मठात दाखल झाले असून त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह, कर्नाटकचे भाजप अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा, एम. बी. पाटील, केजे जॉर्ज आणि सदानंद गौडा मठात दाखल झाले आहे.

शिवकुमार स्वामी यांचा अल्प परिचय

शिवकुमार स्वामींचा जन्म १ एप्रिल १९०७ रोजी रामनगर येथील वीरपूरा येथे झाला. धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पद्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती.

सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत. याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतीच स्वामींना भारतरत्न देण्याची शिफारस केली आहे. शिवकुमार स्वामी हे लिंगायत समाजाच्या सिद्धगंगा मठाचे अधिपती होते. सिद्धगंगा मठ समाजाचा मुख्य मठ असून तो बंगळूरपासून ८० किलोमीटर अंतरावर तुमकूर येथे आहे. कर्नाटकात सिद्धगंगा मठाचा मोठा प्रभाव आहे.

Related posts

विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय; ज्ञानेश्वर म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

Aprna

पंतप्रधान मोदींनी मालाड दुर्घटनाग्रस्तांना जाहीर केली २ लाखांची मदत

News Desk

चीनकडून सरकारविरोधातील वेबसाईडस बंद

News Desk