HW Marathi
देश / विदेश राजकारण

नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये!

मुंबई । प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या तरुण खासदार नुसरत जहाँ यांनी एका हिंदू उद्योगपतीशी लग्न केले. त्यांचे लग्न संपूर्ण हिंदू रीतिरिवाजानुसार झाले. हा त्या पती-पत्नीचा वैयक्तिक निर्णय होता. वाटल्यास त्या नव्या दांपत्याचा ‘पर्सनल लॉ’ म्हणा. विवाहानंतर नववधू नुसरत संसदेत आली. हातास मेहंदी, गळय़ात पल्लेदार मंगळसूत्र, कपाळावर चमकदार ‘कुंकू’ म्हणजे लाल बिंदी. नुसरतच्या या बदलत्या रूपावर कुण्या एका दारूल उलूम देवबंदने म्हणे फतवा काढला. मुस्लिमांनी केवळ मुस्लिम धर्मीयांशीच विवाह करावा. खासदार नुसरत जहाँचा हा पेहराव सध्या सगळय़ांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे, पण काही मुस्लिम धर्मांध संघटनांच्या हनुवटीवरील दाढी मात्र जळू लागली आहे. मुसलमानांच्या भूतकाळातील अनेक पिढय़ा या फतवेवाल्यांनी बरबाद केल्या. धर्मांधतेच्या चिखलातून बाहेर पडून त्यांना कधी मोकळा श्वास घेऊ दिला नाही. सामनाच्या संपादकीयमधून बंगालच्या खासदार नुसरत जँहाच्या कुंकुवावरून सुरू झालेल्या राजकारणाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोद्ध केला आहे.

सामनाचा आजचा अग्रेलख

हिंदुस्थानात अद्यापि तालिबानी राजवट सुरू झालेली नाही व मोकळय़ा वातावरणात जगण्याचा हक्क एखाद्या फतव्याने मारला जाणार नाही. नुसरत जहाँच्या कपाळावरील कुंकू ही देशाची संस्कृती आहे व गळय़ातील मंगळसूत्र हे आयुष्यभराचे संस्कार व सुरक्षेची कवचकुंडले आहेत. तीन तलाक रद्द करण्यामागे हाच संस्कार आहे. तिहेरी तलाकचे जे समर्थन करीत आहेत त्यांनी नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये!

मुसलमान समाजातील काही मंडळींची डोकी म्हणजे रिकामी मडकीच आहेत. देश, समाज कितीही पुढे गेला तरी यांची मानेवरील मडकी तेच बुरसटलेले विषय घेऊन फिरत असतात. प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या तरुण खासदार नुसरत जहाँ यांनी एका हिंदू उद्योगपतीशी लग्न केले. त्यांचे लग्न संपूर्ण हिंदू रीतिरिवाजानुसार झाले. हा त्या पती-पत्नीचा वैयक्तिक निर्णय होता. वाटल्यास त्या नव्या दांपत्याचा ‘पर्सनल लॉ’ म्हणा. विवाहानंतर नववधू नुसरत संसदेत आली. हातास मेहंदी, गळय़ात पल्लेदार मंगळसूत्र, कपाळावर चमकदार ‘कुंकू’ म्हणजे लाल बिंदी. नुसरतच्या या बदलत्या रूपावर कुण्या एका दारूल उलूम देवबंदने म्हणे फतवा काढला. मुस्लिमांनी केवळ मुस्लिम धर्मीयांशीच विवाह करावा. खासदार नुसरत जहाँचा हा पेहराव सध्या सगळय़ांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे, पण काही मुस्लिम धर्मांध संघटनांच्या हनुवटीवरील दाढी मात्र जळू लागली आहे. मुसलमानांच्या भूतकाळातील अनेक पिढय़ा या फतवेवाल्यांनी बरबाद केल्या. धर्मांधतेच्या चिखलातून बाहेर पडून त्यांना कधी मोकळा श्वास घेऊ दिला नाही. शहाबानो प्रकरणातही धर्मांधांनी दबावाचे राजकारण केले व राजीव गांधींच्या काँग्रेसने त्या दबावापुढे शरणागती पत्करली. आज प. बंगालातही ममता बॅनर्जी यांनी

तेच दाढय़ा कुरवाळण्याचे

राजकारण सुरू करताच प्रखर राष्ट्रवादाची वाफ झाकण उडवून बाहेर आली. नुसरत जहाँ त्याच बंगालच्या कन्या आहेत. त्यांच्या भावनांचा सन्मान व्हायला हवा. नुसरत यांनी त्यांच्या इच्छेनुसार लग्न केले. यात धर्मद्रोह असा काय घडला? ‘‘मुस्लिम मुलीने जर हिंदू मुलासोबत लग्न करून मंगळसूत्र घातले आणि कुंकू वा टिकली लावली तर त्यास ‘हराम’ म्हटले जाते. मग ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदू मुलीसोबत लग्न करून तिला बुरख्यात ठेवले तर ते ‘हराम’ नाही काय?’’ असा प्रश्न भाजपच्या साध्वी प्राची यांनी विचारला तो योग्यच आहे. लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी हा एक सोहळाच असतो. संसदेत धार्मिक घोषणा देऊ नयेत, पण यावेळी ‘जय श्रीराम’बरोबर ‘अल्ला हो अकबर’चे नारेही लागले. अनेक मुसलमान खासदारांनी ‘वंदे मातरम्’चा नारा दिला नाही. ‘वंदे मातरम्’ म्हणणे हे इस्लामच्या विरोधात असल्याचे या लोकांनी सांगितले, पण नुसरत जहाँने मात्र खासदारकीची शपथ घेताच ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. मुसलमान समाजातील नवपिढीतला हा बदल आहे. धर्माचे फालतू राजकारण संपवायला हवे व मुसलमानांच्या नव्या पिढीने या धर्मांधतेविरोधी आवाज उठवायला हवा. नुसरत जहाँने वेगळे काहीच केले नाही. नुसरत मुसलमान म्हणून

जन्माला आली यात

तिचा काय दोष? ती शेवटच्या श्वासापर्यंत मुसलमान राहील, तिची श्रद्धा जपून ठेवील, पण एक कडवट हिंदुस्थानी नागरिक म्हणून ‘वंदे मातरम्’चा नारा देत मातृभूमीपुढे झुकणे हा तिचा निर्णय आहे. देशाच्या भूमीवर मस्तक टेकवू नका असे कोणत्या इस्लामने सांगितले? निखिल जैन या हिंदू तरुणाशी लग्न केले म्हणून तिने ‘जय हिंद’ किंवा ‘वंदे मातरम्’चा नारा दिला नाही तर ही ‘ऊर्मी’ तिच्या मनात जन्मतःच उसळत होती. नुसरत जहाँने व्यक्तीशी लग्न केले, धर्माशी नाही. कालच्या लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला मातोंडकरच्या बाबतीत काही ‘पचक्या’ धर्मवीरांनी हाच मुद्दा काढला. ऊर्मिलाने म्हणे एका मुसलमान तरुणाशी लग्न केले व या ‘पचक्यां’ना ऊर्मिलाने सडेतोड उत्तर दिले. हिंदुस्थानात अद्यापि तालिबानी राजवट सुरू झालेली नाही व मोकळय़ा वातावरणात जगण्याचा हक्क एखाद्या फतव्याने मारला जाणार नाही. ‘वंदे मातरम्’ची माती कपाळास लावून प्रत्येकाला आपला धर्म आणि श्रद्धा जपण्याचा हक्क आहे व तो राहावा. देशातील हिंदू व मुसलमान यांनी या नियमाची मोडतोड करून देशाचे वाटोळे करू नये. नुसरत जहाँच्या कपाळावरील कुंकू ही देशाची संस्कृती आहे व गळय़ातील मंगळसूत्र हे आयुष्यभराचे संस्कार व सुरक्षेची कवचकुंडले आहेत. तीन तलाक रद्द करण्यामागे हाच संस्कार आहे. तिहेरी तलाकचे जे समर्थन करीत आहेत त्यांनी नुसरतच्या कपाळावरील कुंकवाची उठाठेव करू नये!

 

 

Related posts

अजित पवार आणि पार्थ पवारांसंबंधी बारामतीतून आली मोठी बातमी

rasika shinde

राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्या २ पीएंना सीबीआयचे समन्स! देशमुखांचीही चौकशी होण्याची शक्यता

News Desk

कुमारस्वामींचे सरकार कोसळणार ?

News Desk