HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘कोरोनामुक्त’, स्वतः ट्विट करून दिली माहिती

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी अमित शाह यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. “आज माझा कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी ईश्वराचे आभार मानतो. माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा देणाऱ्या तसेच या काळात माझ्या कुटुंबियांचे मनोबल वाढविणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो”, असे ट्विट आज (१४ ऑगस्ट) अमित शाह यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण आणखी काही दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये राहणार असल्याचीही माहिती अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.

अमित शाह यांना ३ ॲागस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याने स्पष्ट झाले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित शाह यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे, कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अमित शाह अयोध्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यास देखील उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, आता अमित शाह कोरोनामुक्त झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस ते ‘होम आयसोलेशन’मध्ये राहणार आहेत.

काहीच दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या कोरोना रिपोर्टबद्दल संभ्रम निर्माण झाला होता

अमित शहा यांच्या कोरोना रिपोर्टबद्दल काही दिवसांपूर्वी मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला होता. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी ९ ऑगस्ट रोजी ट्विट करून अमित शाहांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर मनोज तिवारी यांनी आपले ट्विट डिलीट केले होते. त्याचप्रमाणे, त्यानंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले होते कि, “अद्याप अमित शहांची कोरोना चाचणीच केलेली नाही”.

Related posts

उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलेल्या ‘त्या’ दोन भुतांचा देवावर विश्वास नाही !

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांकडून सूचना

अपर्णा गोतपागर

#CoronaVirus : राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण

अपर्णा गोतपागर