HW News Marathi
देश / विदेश

जागतिक वडापाव दिन

मुंबई | आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव.

वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले.

23 ऑगस्ट 2001 ला धीरज गुप्ता या व्यक्तीनं वडापावला इंडियन बर्गरचं रुप देत, जंबो वडापाव फूड चेन सुरु केली. त्यानिमित्तानंच त्यांच्या 9 शहरातल्या शाखा हा जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे. वडापाव हे खरंतर सामान्यांचं फूड. मुंबईत गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हे पटकन रुजलं. खायला काही प्लेट लागत नाही ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. त्यामुळेच मुंबईच्या कामगार संस्कृतीची तो ओळख बनला. आज मुंबईत दिवसाला जवळपास 18 ते 20 लाख वडापाव खपतात.

23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिन

कधी सुरु झाला ?

दादर स्टेशनाबाहेर 1966 साली अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.

रोजगाराचे साधन आणि राजकीय पाठिंबा… –

१९७० ते १९८० च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसाने उद्योगात उतरावे या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.

परदेशातही वडापावचा बोलबाला –

अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतला विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएच.डी. केली आहे.

लंडनमध्ये मुंबईतील रिझवी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2010 रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे. सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) या दोघांनी सुरु केलेल्या श्री कृष्ण वडापाव नावाच्या या हॉटेलच्या उद्योगातून ते आज वर्षाला चार कोटींहून अधिक रुपये कमावतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar

पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ विधेयकाला मंजुरी

swarit

‘सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही माझ्या डोळ्यांसारखे आहेत!’ व्यंकय्या नायडू दोषी खासदारांवर कारवाई करणार

News Desk