HW News Marathi
देश / विदेश

बिहारचे राज्यपाल कोविंद एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार

उमेदवारीबाबत २२ जूनला युपीएची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली – भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या रामनाथ कोविंद यांना एनडीएनं राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. भाजपनं संसदीय समितीच्या बैठकीत कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. एनडीएच्या सर्व मित्रपक्षांच्या सहमतीनंच कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. कोविंद हे २३ जूनला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

‘रामनाथ कोविंद मूळ उत्तप्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते’. अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करूनच भाजपच्या संसदीय समितीला कोविंदं यांचं नाव सांगितलं, अशी माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही नाव कळवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नाव ठरल्यावर कळवू असं अमित शहा भेटीत सांगितलं होतं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि स्वामीनाथन यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात हे पहावं लागेल.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपा नेमकी कोणाला उमेदवारी देते यावरुन अखेर अमित शहांनी पडदा उचलला. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा सुरु होती. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचंही नाव चर्चेत होतं. भाजपा त्यांना उमेदवारी देईल असा अंदाज होता. दिल्लीत तर रविवारी काही पोस्टर्सही झळकले होते.

रामनाथ कोविंद यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात

कोविंद यांचा 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यातील परौंख या खेड्यात झाला. कोविंद यांचं बीकॉम, एलएलबी शिक्षण झालं असून वकिली हा त्यांचा व्यवसाय होता. तसेच ते भाजपाचे एक नेते होत. भाजपा दलित मोर्चाचे अध्यक्षस्थान भूषवलेल्या कोविंद यांची राज्यसभेचे खासदार म्हणून 1994 ते 2006 या कालावधीत निवड करण्यात आली होती. कोविंद विवाहित असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. 8 ऑगस्ट 2015 रोजी त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोविंद यांनी अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्षपदही यापूर्वी भूषवलेले आहे.

उमेदवारीबाबत २२ जूनला युपीएची दिल्लीत बैठक

आज भाजपाकडून राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. युपीए आघाडीकडून राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण? हे ठरविण्यासाठी येत्या २२ जूनला दुपारी चार वाजता, दिल्लीत युपीएच्या घटक पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहे. या बैठकीमध्ये चर्चा होऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला कुठल्या पध्दतीने सामोरे जायचे या संबधीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपसभापती पदासाठी निवडणूक होणार 

News Desk

पोलिसांची जागा घेणार कुत्रे

News Desk

जम्मूमधील बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk