HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

…म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात

अश्विन शुद्ध दशमीलाच ‘विजयादशमी’ असे म्हणतात. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते जाते आणि दहाव्या दिवशी ‘विजयादशमी’ साजरी करण्यात येते. दसरा म्हणजेच विजयादशमी हा उत्सव विजयाचे प्रतीक आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरार्‍याचे वैशिष्ट्य मोठे आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण आपल्या परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायला शिकवतो. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते.

देवीने दसऱ्याच्याच दिवशी महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला होता, असे म्हटले जाते. श्री रामाने नऊ दिवस उपवास करून आदिमायेची म्हणजेच देवीची उपासना केली होती, असे मानतात. त्यानंतर या आदिमायेच्याच कृपेने दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ असे सुद्धा म्हटले जाते. यादिवशी भारतात बऱ्याच ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून आनंदोत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्रात विजयादशमीच्या दिवशी सर्वांना सोने म्हणून आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. ग्रामीण भागात सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याच्या पानांचे पूजन केले जाते. तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना केली जाते. अपराजिता देवीकडे ‘मला विजयी कर’ अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्याानी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करण्याची प्रथा आहे. दसरा हा सुरुवातीच्या काळात शेतीशी संबंधित लोकांचाच उत्सव होता. शेतकऱ्याच्या शेतातील पहिले पीक यावेळी त्याच्या घरी येई. म्हणून शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात दसऱ्याच्या दिवशी शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची प्रथा देखील प्रचलित आहे.

आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्यामागची कथा

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून काय हवे याची विचारणा केली. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरूस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय, असे गुरूंनी म्हणूनही कौत्साने गुरुदक्षिणेसाठी आग्रह धरला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला.

परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला.परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले. कौत्साचे भाषण ऐकून चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्याकडे ठेवून घेतले. तसेच थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी दाखविली. ही गोष्ट इंद्रदेवांस समजताच त्यांनी अयोध्या नगराबाहेरील आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला.

रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेले. मात्र ऋषींनी फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्त्यास परत दिल्या. उरलेल्या मुद्रा कौत्सने रघुराजास आणून दिल्या परंतु राजानेही त्या घेतल्या नाहीत. शेवटी कौत्स्याने व शमीच्या झाडाखाली त्या सुवर्णमुद्रांचा ढीग करून त्या लोकांस नेण्यास सांगितले. लोकांनी त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. म्हणून हा दिवस विजयादशमीचा म्हणून ओळखला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

नवरात्रीनिमित्त दांडिया आणि घागरा-चोलीची बाजारात विक्री

Gauri Tilekar

पद्मश्री पी.व्ही. सिंधूचा रोमांचक प्रवास

News Desk