HW News Marathi
राजकारण

मुंबईच्या मतदार यादीमध्ये सुमारे ८ ते ९ लाख बोगस मतदार !

मुंबई | “आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा सूळसुळाट असेल आणि ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एकाच व्यक्तीच्या नावे ११ ते १३ मतदान ओळखपत्र आढळून आलेले आहेत. एखाद्या मतदार संघात एक व्यक्ती परंतु त्याची विविध जाती धर्माची वेगवेगळी नावे, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वयोमर्यादा, वेगवेगळे बूथ नंबर मिळालेले आहेत”, अशी धक्कादायक माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे. संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कडक पावले उचलली पाहिजेत, अशीही मागणी निरुपम यांनी यावेळी केली. नितीन शिंगाटे यांच्या एकलव्य सॉफ्टवेअरच्या आधारे समोर आलेली ही माहिती स्पष्ट करून सांगताना संजय निरुपम म्हणाले कि, “ठाणे विधानसभा क्षेत्रात जिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आहेत तेथे मतदार ओळखपत्रांमध्ये ८३८ पैकी फक्त १८२ खरे मतदार आहेत. तसेच दिंडोशी विधानसभा क्षेत्रात जेथे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आहेत तेथे ५५२ पैकी फक्त २९० खरे मतदार सापडले आहेत”. निरुपम यांनी संबंधित सर्व कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. या पत्रकार परिषदेला एकलव्य सॉफ्टवेअरचे नितीन शिंगोटे, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, प्रवक्ते अरुण सावंत उपस्थित होते.

बोगस मतदार माफिया टोळी कार्यरत

“मुंबईच्या मतदार यादीतील सुमारे ८ ते ९ लाख बोगस मतदार असून बोगस मतदार माफिया टोळी कार्यरत आहे. मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १५ ते २० हजार आणि लोकसभा क्षेत्रामध्ये १ ते १.५ लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे. हा खूप मोठा बोगस मतदार ओळखपत्रांचा घोटाळा आहे. सुमारे १५ ते २० हजार बोगस मतदार ओळखपत्र अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजी नगर आणि चांदिवली येथे सुद्धा सापडले आहेत”, असेही संजय निरुपम यावेळी म्हणाले.

बोगस मतदार ओळखपत्र या मतदार यादीतून वगळली पाहिजेत !

“निवडणूक आयोग ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मसुदा रोल (Draft Roll) जाहिर करणार आहेत. त्याआधी सर्व बोगस मतदार ओळखपत्र या मतदार यादीतून वगळली पाहिजेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागांकडे सुसज्ज अत्याधुनिक सॉफ्टवेअर, पुरेसे कर्मचारी नाहीत. आगामी निवडणुका काहीच दिवसांवर आलेल्या असताना महाराष्ट्र सरकारने या त्रुटी ताबडतोब दूर करायला हव्या”, अशी आग्रही मागणी यावेळी संजय निरुपम यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारीच या घोटाळ्यात सहभागी

“मुंबईतील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाने बोगस मतदार ओळखपत्रांची समस्या गंभीरपणे घेऊन ताबडतोब कडक पावले उचलली पाहिजेत. त्यांना शोधून त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली पाहिजेत. आमच्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक अधिकारीच या घोटाळ्यात सहभागी आहेत. पैसे घेऊन हे अधिकारी हे बोगस ओळखपत्रे तयार करून देण्याची कामे करतात”, असा आरोप देखील यावेळी संजय निरुपम यांनी केली आहे.

बोगस ओळखपत्रांसह निवडणूक आयोग ३१ जानेवारीला ड्राफ्ट रोल जाहिर करणार ?

“या बोगस ओळखपत्रांसह निवडणूक आयोग ३१ जानेवारीला ड्राफ्ट रोल जाहिर करणार आहे का ? निवडणूक आयोग याबाबत गंभीरपणे विचार करून त्वरित कारवाई करणार आहे की नाही ? ३१ जानेवारीपूर्वी जिल्हाधिकारी कारवाई करणार आहेत की नाही ? या बोगस ओळख पत्र घोटाळ्यामुळे शेकडो खऱ्या मतदारांना ओळख पत्र कसे मिळणार ?”, असे अनेक गंभीर प्रश्न यावेळी संजय निरुपम यांनी उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

Aprna

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk