मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (२७ मे) इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्ट्समुळे या चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून लढावे यासाठी शिवसेनेकडून एक सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
“हीच वेळ आहे, हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय”, असा मजकूर लिहीत वरुण सरदेसाई यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरे यांना मिठी मारत असल्याचा एक फोटो शेअर केला. वरुण सरदेसाई यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान, पक्षाकडून किंवा आदित्य ठाकरेंकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आदित्य ठाकरे यांनी यंदा विधानसभा लढवावी, अशी इच्छा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नव्या पिढीसाठी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी ही विधानसभा निवडणूक लढविणे गरजेचे असल्याचे युवासेनेचे मत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.