मुंबई । राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी (३१ ऑक्टोबर) भेट घेतली. “राज्यपाल हे राज्याचे पालक आहेत. म्हणूनच राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत सध्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी आणि मच्छीमारांच्या तात्काळ मदतीसाठी तातडीने पावले उचलावीत याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली”, अशी माहिती या आदित्य ठाकरे यांनी दिली. शिवसेनेकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना आमदारांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
Aditya Thackeray, Shiv Sena after meeting Maharashtra Governor: We requested Governor to provide assistance to farmers and fishermen who suffered damages due to recent rains. He has assured us that he himself will talk to the Centre. pic.twitter.com/Wdyj3oJIir
— ANI (@ANI) October 31, 2019
राज्यात सध्या विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. “पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी. त्याचप्रमाणे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी अशा मागण्या शिवसेनेकडून राज्यपालांकडे करण्यात आलेल्या आहेत. राज्यपालांनी देखील यावेळी मदतीचे आश्वासन दिले आहे”, अशीही माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास आठवडा उलटत आला असला तरीही अद्याप राज्यात कोणीही सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये असलेला बेबनाव आणि सत्तास्थापनेकरिता सुरू असलेली कमालीची चढाओढ पाहता हा तिढा आणखी वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपल्या या राज्यपालांच्या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.