मुंबई | आज मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दराने १३ शहरांमध्ये नव्वदी पार केलेली आहे. राज्य सरकारला जनतेबद्दल जराही सहानुभूती नाही आहे. आजचा दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘काळा दिवस’ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. आजवरच्या काळातील सर्वात असंवेदनशील सरकार आहे, असे विधान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत काढले. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, प्रवक्ते अरुण सावंत आणि माजी नगरसेवक जॉर्ज अब्राहम उपस्थित होते.
निरुपम म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात १३ जिल्हे असे आहेत, जिथे पेट्रोलचा दर ९० रुपयांपेक्षा जास्त आहे. परभणी, मुंबई, नंदुरबार, नांदेड, लातूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, बुलढाणा, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा दर ९० रुपयांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पेट्रोलचा दर नांदेडमध्ये आहे. नांदेड मध्ये पेट्रोल ९१.६१ रुपये प्रती लिटर आहे, अमरावती मध्ये ९१.३१ रुपये, रत्नागिरी मध्ये ९१.१४ रुपये आणि जळगावमध्ये ९१.०१ रुपये लिटर इतका पेट्रोलचा दर आहे. पेट्रोल आणि डीझेल च्या दरांमध्ये झालेली वाढ ही पूर्णतः राज्य आणि केंद्र सरकारने लादलेल्या विविध करांमुळे झालेली आहे. पेट्रोलवर सर्वात जास्त वॅट मुंबईमध्ये लावला जातो. मुंबईमध्ये ९० रुपये लिटर पेट्रोलमध्ये साधारणतः ४० ते ४५% टक्केवॅट लावला जातो. डिझेलवर २१% वॅट लावला जातो. मागील २ वर्षांमध्ये आम्ही या दरवाढीविरोधात बरीच आंदोलने केली. मोर्चे काढले, काही दिवसांपूर्वी भारतबंद सुद्धा करण्यात आला होता. पण एवढे करून सुद्धा सरकारला जाग आलेली नाही. जेवढी आंदोलने केली तेवढेच पेट्रोल महाग होत गेले. त्यामुळे महागाई सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. या दरवाढीचा परिणाम इतर गोष्टींवर सुद्धा होत आहे. टूथपेस्ट, तेल, साबण, वनस्पती तेल, या सर्व एफएमसीजी उत्पादनामध्ये आणि टीव्ही, लॅपटॉप, फ्रिज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे दर ५ ते ७% वाढले आहेत.
आमची भाजप सरकारकडे एकच मागणी आहे की, ज्याप्रमाणे आंध्रप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक राज्यांनी पेट्रोल व डिझेलवरील राज्य शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या करांमध्ये (वॅट) कपात केली. त्याच प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या करांमध्ये (वॅटमध्ये) कपात करावी. तसेच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे की, त्यांनी केंद्र सरकारतर्फे लावण्यात येणाऱ्या सेस (SES) मध्ये कपात करावी किंवा काढून टाकावे. सेस आणि वॅटमुळे पेट्रोल व डिझेलचे भाव संपूर्ण देशामध्ये गगनाला भिडलेले आहेत. याच मागणीसाठी आम्ही भविष्यात मोठे आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत.