HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल !

जे रामाचे नाव घेऊन सिंहासनावर बसले त्यांना रामनामाची आठवण करून द्यायला आम्ही जात आहोत. हे दर्शन आहे. मतांसाठी हिंदुत्वाचे राजकीय प्रदर्शन नाही. साधू-संतांचे, महंतांचे, रामभक्तांचे, शरयूत रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचे आशीर्वाद आमच्या कार्यास लाभतील. नव्हे ती भरलेली ओंजळ घेऊनच आम्ही अयोध्येचा प्रवास करणार आहोत. तीच आमची शस्त्र आहेत. म्हणून शिवसेना तेजाने तळपते आहे. 2019 ला हेच तेज खोटेपणाचा, भ्रष्टाचाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. लाखो शिवसैनिकांच्या हिमतीवर आम्ही लढायला सज्ज आहोत. उद्याचे राज्य शिवसेनेचेच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल. असे वक्तव्य शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या संपादकीयमधून केले आहे. आज शिवसेनेचा दसरा मेळावा असल्यामुळे उद्धव ठाकरे काय नविन घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

विजयादशमी म्हणजे दसर्‍याचे सोने लुटायचा दिवस परंपरेने उजाडला आहे. पण नेमके असे राज्याचे चित्र काय आहे? सत्य सांगायचे ठरवले तर, गोडाधोडाच्या दिवशी राज्यकर्त्यांची तोंडे कडू होतील. जनतेच्या जीवनात आनंद, स्थैर्य, सुरक्षा, आरोग्य निर्माण करण्यासाठी लोकशाही मार्गाने सिंहासने मिळवली जातात. खर्‍या अर्थाने ते लोकांचे राज्य म्हटले जाते, पण आज लोकांना गुलाम बनवून राजसिंहासने भ्रष्ट मार्गाने विकत घेतली जातात व लोक मात्र देशोधडीला लागलेले दिसतात. बाजूच्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री आजारी आहेत. घरातच अतिदक्षता विभाग तयार करावा लागला अशी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असताना राज्य टिकविण्यासाठी काँग्रेसचे दोन आमदार फोडले गेले आणि उरलेलेही फोडून राज्य टिकवू अशी बतावणी नैतिकतेचे व साधनशूचितेचे धडे देणारे करतात तेव्हा अशा ढोंगबाजीची किळस येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ यांनीही आता घोषणा केली आहे, पुढची पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहणार आहेत. राज्यात दुष्काळाचा वणवा, महागाईची होरपळ पेटली असताना पुढची पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणे ही शेरेबाजी हास्यास्पद ठरते. म्हणजे तुम्ही राज्यात आणि देशात निवडणुका घेणारच नाहीत आणि घेतल्या तरी तुमच्या त्या ‘ईव्हीएम’ दक्ष परिवाराने निकालाची बटणे कमळाबाईच्या नावाने आधीच दाबून ठेवली आहेत काय? तसे नसते तर हा इतका फाजील आत्मविश्वास साबणाच्या फेसाप्रमाणे फसफसला नसता. लोकांना अन्न नाही, पाणी नाही, गुरांना चारा नाही, मुलांना धड शिक्षण नाही आणि कमळाबाईच्या मालकांना भविष्यातील खुर्च्यांची स्वप्ने पडतात. लोकांच्या स्वप्नांची साफ राखरांगोळी गेल्या चार वर्षांत झाली आहे. राज्य आधी होते त्यापेक्षा कर्जबाजारी झाले आहे. तुम्ही कितीही दणकून खोटे बोला, पण सरकार चालविण्यासाठी, कर्मचार्‍यंचे पगार देण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे हीच वस्तुस्थिती आहे. मेट्रो, मोनो रेल, बुलेट ट्रेनचा खड्डाही राज्याला गाळात नेत आहे, पण पंतप्रधानांच्या स्वप्नासाठी

देशाचे स्वप्न मारणे

हाच कारभार सुरू आहे. सत्य बोलणारे विरोधक त्यामुळे देशद्रोही ठरवले जात आहेत. ही त्यांच्या दळभद्री लोकशाहीची शोकांतिका ठरत असली तरी भाड्याची गर्दी जमवून खोटेपणाची गिधाडे उडवण्याचे काम सुरूच आहे. महाराष्ट्रात प्रत्येक समाज आपापल्या मागण्या घेऊन रस्त्यांवर उतरला आहे. दलित, मराठा, धनगर, वंजारी, तेली, तांबोळी असा प्रत्येकजण असंतोषाच्या बंडाचा झेंडा घेऊन रस्त्यांवर उतरला. हे काही राज्य स्थिर आणि शांत असल्याचे लक्षण नाही. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ यामधील तफावत मुख्यमंत्री फडणवीसांना चार वर्षांत दूर करता आली नाही. बरं, तसे करण्याचे वचन देणारे तुम्हीच होता. सत्ता दिल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे वचन तुम्हीच दिले होते ना? मात्र सत्ता मिळाल्यावर आपल्याच वचनांना यांनी पाने पुसली. त्यामुळेच आज राज्यात सर्वत्र सामाजिक असंतोषाचा भडका उडाला आहे. असंतोषाला प्रत्येक वेळी जनताच जबाबदार असते असे नाही, तर राज्यकर्तेही तितकेच जबाबदार आहेत. चेहरे बदलले, माणसं बदलली, काळ बदलला, पण परिस्थिती आजही तशीच आहे. मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार सुरूच आहेत. पेट्रोल, डिझेलचे भाव नव्वदी पार करत असताना अचानक दोन-चार रुपये स्वस्त केल्याची बोंब मारली गेली, पण आधी पंचवीस रुपये वाढवले त्याचे काय? म्हणजे आधी पंचवीस रुपयांची भाववाढ करायची आणि नंतर त्यात रुपया-दोन रुपये कपात करून ‘स्वस्ताई’ आणल्याचे ढोल पिटायचे. आधी गरीबांच्या अंगावरील सर्व कपडे उतरवायचे व नंतर मेहेरबानी म्हणून एक फाटकी चिंधी अंगावर फेकायची, असा हा प्रकार आहे. मागील तीन वर्षांत देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तिला सावरण्यासाठी नेहमीच सामान्य माणसाला कात्रीत पकडण्याचे प्रयोग झाले. करवाढ आणि चलनवाढीच्या कात्रीत नेहमी सामान्य माणसाचा बळी गेला. राज्यकर्त्यांची उधळण मात्र थांबली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांत परदेश दौर्‍यावर 550 कोटी रु. खर्च केले.

मोदी यांनी चार वर्षांत

पंधराशे कोटींवर खर्च जग फिरण्यासाठी केला. ‘राफेल’चा विमान घोटाळा आहेच. बोफोर्सची दलाली 65-75 कोटींची होती. राफेलची मांडवली काही हजार कोटींची आहे. तिकडे सीमेवर सैनिक पाकड्यांकडून रोजच शहीद होत आहेत. कश्मीर पेटले आहे. कश्मिरी पंडित आजही निर्वासितांच्या छावण्यांत मरणयातना भोगत आहेत आणि अयोध्येतला प्रभू श्रीराम हिंदुत्ववादी भाजपवाल्यांचे राज्य येऊनही उद्धाराच्या प्रतीक्षेत ‘वनवासी’ बनला आहे. त्याच्या अयोध्येत तो बंदिवान बनून उभा आहे. रामनाम फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठी. बाबरीचा हल्लाबोल शिवसैनिकांनी केला नसता तर तो कलंकही कधीच दूर झाला नसता. आज केंद्रात, राज्यात, राष्ट्रपती भवनातही भाजपचे पूर्ण बहुमताचे राज्य येऊनही राममंदिराचा प्रश्न न्यायालयाच्या खांद्यावर टाकून ‘मंडळी’ मोकळीच आहेत. शरयूच्या तीरावर ज्यांनी हिंदुत्वासाठी रक्त सांडले, प्राण गमावले त्यांचा हा अपमान आहे. राममंदिर निर्माण करण्यासाठी एक कायदा बनवा. 2019 आधी मंदिराची उभारणी सुरू करा हेच जनतेचे मागणे आहे. सत्ताधार्‍यंना तशी बुद्धी द्या व तुमची वनवासातून मुक्तता होऊ द्या हे साकडे घालण्यासाठीच आम्ही अयोध्येकडे निघालो आहोत. जे रामाचे नाव घेऊन सिंहासनावर बसले त्यांना रामनामाची आठवण करून द्यायला आम्ही जात आहोत. हे दर्शन आहे. मतांसाठी हिंदुत्वाचे राजकीय प्रदर्शन नाही. साधू-संतांचे, महंतांचे, रामभक्तांचे, शरयूत रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचे आशीर्वाद आमच्या कार्यास लाभतील. नव्हे ती भरलेली ओंजळ घेऊनच आम्ही अयोध्येचा प्रवास करणार आहोत. तीच आमची शस्त्र आहेत. त्या शस्त्रांची धार कधीच बोथट झाली नाही. म्हणून शिवसेना तेजाने तळपते आहे. 2019 ला हेच तेज खोटेपणाचा, भ्रष्टाचाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. लाखो शिवसैनिकांच्या हिमतीवर आम्ही लढायला सज्ज आहोत. उद्याचे राज्य शिवसेनेचेच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : ‘मै भी चौकीदार’ व्हिडिओवर काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk

#LokSabhaElections2019 : मोदी साहेब, २०१४ सालच्या ट्रिक्स आता कामी येणार नाहीत !

News Desk

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

News Desk