HW Marathi
राजकारण

राफेलवर झालेल्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान, पंतप्रधान मोदींची टीका

नवी दिल्ली | “राफेल करारावर झालेल्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आज देशाला राफेलची कमतरता जाणवते आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०१९’मध्ये बोलत होते. “आज आपल्याकडे राफेल विमाने असती तर पाकिस्तानचे काय झाले असते असे प्रश्न मला जनतेकडून विचारले जात आहेत. तुम्ही मला विरोध करा, परंतु या मोदी विरोधाचा फायदा मसूद अझहर आणि हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांना होऊ देऊ नका”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

“आज संपूर्ण देश भारतीय लष्करासोबत खंबीरपणे उभा असताना विरोधक मात्र भारतीय लष्कराच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित करत आहेत. तुम्हाला लष्कराच्या सामर्थ्यावर शंका आहे की विश्वास आहे ? या प्रश्नाचे त्यांनी मला उत्तर द्यावे. तुम्ही मोदी विरोध करा परंतु देशाच्या सुरक्षेविषयीच्या, देशहितासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींना विरोध करू नका”, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून गेले कित्येक महिने पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर राफेल करारावरून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विरोधकांनी राफेल कराराचे अशा प्रकारे स्वार्थी राजकारण केल्यानेच आज देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

राज्यात ७ जागांसाठी आज मतदान, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Gauri Tilekar

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

News Desk