HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : देशातील राजकारणाची घसरलेली पातळी

नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अंतिम टप्पा रविवारी (१९ मे) पार पडला. ११ एप्रिलपासून १९ मेपर्यंत देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी लक्षात राहील अशीच झाली आहे. सत्ता आणि मतांच्या गणितांसाठी केलेले पक्षांतर, अनपेक्षितपणे बदललेली राजकीय समीकरणे, राजकीय पक्षांचे-नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, वादग्रस्त विधाने, अत्यंत खालच्या पातळीची वैयक्तिक टीका, टोकाची हिंसा अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक आणि निवडणुकांचा प्रचार प्रचंड चर्चेत राहिला.

कधी कुणी कुणावर चप्पल फेकून मारली, कोणी कुणाच्या कानशिलात लगावली तर कोणी अगदी पातळी सोडून अश्लिल शब्दात टीका केली, कोणी धार्मिक तेढ निर्माण केली तर कोणी वैयक्तिक टीका करताना कुटुंबियांवर धूळफेक केली. या निवडणुकांदरम्यान घडलेल्या घटना आणि विधानांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल कि देशातील राजकारणाची पातळी किती खालावली आहे. उदाहरणासाठी आपण अशा काही घटना आणि विधानांबाबत जाणून घेऊया.

आजम खान यांची जया प्रदा यांच्यावर अश्लील टीका

समाजवादी पक्षाचे महासचिव आजम खान यांनी अतिशय अश्लील शब्दात अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने आजम खान यांना नोटीस बजावली होती. “रामपूर वासियो, उत्तर प्रदेश वासियो आणि देशवासियो ज्यांचा चेहरा ओळखायला तुम्हाला १७ वर्षे लागली. मी त्यांना १७ दिवसात ओळखले”, असे म्हणत पुढे आजम खान यांनी अश्लील शब्दात उमेदवार जया प्रदा यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे त्यांचे भाषण सुरु असताना मंचावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव देखील उपस्थित होते.

जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर चप्पल भिरकावण्यात आली

दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरु असताना भाजप नेते आणि खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर चप्पल भिरकावण्यात आली होती. या प्रकारानंतर चप्पल भिरकावणाऱ्या व्यक्तीला पकडून बाहेर काढण्यात आले. चप्पल भिरकावणाऱ्या व्यक्तीचे नाव शक्ती भार्गव असे असून तो पेशाने डॉक्टर असल्याच सांगण्यात आले.

हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगाविली

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे एका मंचावर भाषण सुरु असतानाच एका अज्ञात व्यक्तीने चक्क त्यांच्या कानशिलात लावली होती. एका प्रचारसभेत हार्दिक पटेल भाषण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने चक्क व्यासपीठावर चढून हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लागाविली. तरुण गज्जर असे या व्यक्तीचे नाव होते. या संदर्भात हार्दिक पटेल यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुकी

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना अमळनेर येथे भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये चांगलीच धक्काबुकी करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही मोठी हाणामारी झाली. यावेळी व्यासपीठावरच जिल्हाध्यक्ष आणि आमदार हे एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचे सांगण्यात आले. मात्र, खुद्द गिरिश महाजन आणि गुलाबराव पाटील त्यांच्यासमोरच हा संपूर्ण प्रकार घडला.

आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका | शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशावरूनच टीका केली. माढ्यात १९ एप्रिलला शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना लक्ष्य करत त्यांनी ही टिका केली होती. “भाजपमध्ये गेलात, आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका. नाहीतर सहकार महर्षींना काय वाटेल ?” अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केली होती.

तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता | मुख्यमंत्री

शरद पवार यांच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील यावर प्रत्युत्तर दिले आहे. “पराभव समोर दिसत असल्यानेच शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर चड्या घालून मांड्या दाखवू नका, असे ते म्हणाले. परंतु, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे विसरू नका.२३ मेला कळेल की, कोणाच्या चड्ड्या उतरतील”, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राजीव गांधी ‘भ्रष्टाचारी नंबर १’ | पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. “तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत ‘मिस्टर क्लीन’ म्हटले होते. परंतु, हळूहळू ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात त्यांचे आयुष्य संपले. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र, फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही”, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत केले होते.

हिंमत असेल तर राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर लढवून दाखवावेत | पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींवर याप्रकरणी देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. मात्र, आपल्या विधानबाबत कोणतीही दिलगिरी व्यक्त न करता पुढे झारखंड येथील प्रचारसभेत पुन्हा एकदा मोदींनी असेच विधान केले. “मी नुसते राजीव गांधींचे नाव घेतले तर त्यांच्या पोटात जोरदार दुखू लागले. त्यांनी नुसते रडणेच बाकी ठेवले आहे. मात्र, ते यावरून जेवढे रडतील तेवढेच जास्त जुने सत्य आजच्या पिढीसमोर येईल. जर राहुल गांधींमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीतील उर्वरित पुढचे दोन्ही टप्पे राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाच्या मुद्द्यावर लढवून दाखवावेत”, असे आव्हान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला दिले.

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील !

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तर वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु केली आहे. ”नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील,” असे वादग्रस्त विधान करून मुक्ताफळे उधळली.

मी हेमंत करकरे शाप दिला होता कि, तुमचा सर्वनाश होईल !

“माझी अडवणूक रोखण्यासाठी षडयंत्र रचले गेले होते. मला ९ वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवले गेले. त्यामुळे मी २० वर्षे मागे गेले”, असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. “हेमंत करकरे यांनी मला खोट्या प्रकरणात फसविले. मी त्यांना शाप दिला होता कि, तुमचा सर्वनाश होईल. शेवटी ते दहशतवाद्यांकडून मारले गेलेच. त्यांचा मृत्यू त्यांच्या स्वत:च्या कर्मानेच झाला”, असे संतापजनक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.

१९८४ साली जे झाले ते झाले !

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानात आपल्या प्रचारसभेत शीख दंगलीवरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. “काँग्रेसला आपल्या पूर्वजांच्या नावावर मते हवी आहेत. परंतु, त्यांची कारस्थाने समोर आणली कि त्यांना त्रास होतो. “१९८४ च्या शीख दंगलीचा हिशेब कोण देणार ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता. या पार्श्वभूमीवर “आता १९८४ चा काय संबंध ? तुम्ही (मोदी) ५ वर्षात काय केले ? त्यावर बोला. १९८४ मध्ये जे झाले ते झाले. तुम्ही काय केले ?”, असे पित्रोडा यांनी म्हटले होते.

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध टीएमसी अशी अत्यंत आक्रमक लढत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील वारंवार पंतप्रधान मोदींविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसल्या. मात्र, प्रचारादरम्यान या संघर्षाने अत्यंत हिंसक वळण घेतले. कोलकाता येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रॅलीदरम्यान आज (१४ मे) भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. या रॅलीदरम्यान चक्क अमित शहा यांच्या ट्रकवर काठ्या भिरकावण्यात आल्या. त्याचप्रमाणे भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची देखील मोडतोड करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk

राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत! – सुभाष देसाई

Aprna

तेलंगणात निकालापूर्वीच सत्ता स्थापनेची तयारी

News Desk