HW News Marathi
राजकारण

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, पुण्यात बुधवारी (९ ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पुण्यातील जाहीर सभा रद्द झाली. त्यानंतर, गुरुवारी (१० ऑक्टोबर) मुंबईत सांताक्रूझमधील सभेनंतर गोरेगावमध्ये राज ठाकरे यांनी आपली दुसरी जाहीर घेतली. ईडीच्या चौकशीनंतर आता प्रथमच राज ठाकरे जनतेशी संवाद साधत असल्याने त्यांच्याकडे सभांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, आज झालेल्या सभेत “ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे

राज ठाकरे यांच्या प्रचारसभेत महत्त्वाचे मुद्दे :

१. २०१४ ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा आणला होता. हे करणारा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ देशातील एकमेव पक्ष आहे. हा विकास आराखडा आणणार हे मी पक्ष स्थापनेच्या वेळेस मी बोललो होतो आणि तो आणला.

२. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबधी देशात मी सोनिया गांधीपासून ते ममता बॅनर्जी ते शरद पवारांना देखील भेटलो. मी सुचवलं होतं की ह्या मुद्द्यावर आपण निवडणुकांवर बहिष्कार घालावा, त्याची जागतिक बातमी होणं गरजेचं. हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला, त्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

३. त्याच दरम्यान कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं होतं, आपल्या पक्षाचे आणि इतर काही पक्षांचे कार्यकर्ते मदत कार्यात गुंतले म्हणून मोर्चा पुढे ढकलला.

४. त्यात मला ईडीची नोटीस आली, त्यावेळेस चौकशी झाल्यावर मी बोललो होतो की ‘ईडीची चौकशी लावा, काही करा माझं थोबाड बंद होणार नाही”

५. ह्या आरेत २७०० झाडं कापली, आणि न्यायालयं देखील सरकारला पूरक निर्णय देतात, बरं पर्यावरण मंत्री शिवसेनेचे होते, ते ही कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की, ‘आम्हाला सत्ता द्या. आम्ही आरेला जंगल घोषित करू. आम्हाला मूर्ख समजता का?’

६. उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि राज्य थंड आहे कारण कोणी काही बोलत नाहीये.

७. काय झालं शिवस्मारकाचं? अहो ह्या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे पण ह्या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्याना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत.

८. विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षात जाऊन बसतोय, नेते इकडून तिकडे सहज उड्या मारत आहेत, आणि आपण सगळे शांतपणे बघत बसलोय. तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट राजकारणावर अवलंबून आहे.

९. सरकार म्हणतंय की आम्ही १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्डयांना मुख्यमंत्री ‘विहिरी’ म्हणत आहेत का? काय बोलतंय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे.

१०. जाहीरनामे येणार आणि जाणार, तुम्ही भूलथापांना बळी पडणार… तुमच्या मनात राग आहे का नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही?

११. ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठ. आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल.

१२. बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केला. मेट्रोच्या कार शेडसाठी मी बीपीटीची जागा सुचवली होती, आरेत कारशेड नको ह्यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला होता. सरकारला सांगितलं होतं की, ‘जिथून मेट्रो सुरु होत आहे तिथे कार शेड करा.’ पण सरकारला कोणाच्या घशात ती बीपीटीची जागा घालायची आहे?

१३. आज मुंबईत, ठाण्यात वाट्टेल ती लोकं येऊन राहत आहेत, ती कुठून येत आहेत, काय करत आहेत ह्याचा सरकारला पत्ता नाही. पाकिस्तान, बांग्लादेश मधून आलेल्या घुसखोरांचे मोहल्लेच्या मोहल्ले उभे राहतात आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही पण आमच्या सणांना सरकार विरोध करतं, बंधनं आणतं.

१४. आज महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या ३७० कलमबद्दल बोलत आहेत; ३७० कलम काढलं ह्या बद्दल अभिनंदन पण ह्याचा आमच्या महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध? आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार? आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार?

१५. जपानकडून कर्ज घेऊन १ लाख १० हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारताय? काकोडकर समितीचा अहवाल आहे की देशातील रेल्वेचं जाळं सुधारायला फक्त १ लक्ष कोटींची गरज आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण निरुपयोगी बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत?

१६. ह्या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, का? ह्या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?

१७. शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी आरोळी ठोकली होती की आम्ही राजीनामा देऊ, आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची १२४ जागांवर अडली. ह्या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून मी पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला !

News Desk

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Darrell Miranda

माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे | राम कदम

News Desk