HW Marathi
राजकारण

…म्हणून सुनावणी संपताच साध्वी प्रज्ञा यांनी भर न्यायालयात केला थयथयाट

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी शुक्रवारी (७ जून) मुंबईच्या एनआयए न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोपाळच्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा यावेळी सुनावणीला हजर राहिल्या होत्या. मात्र, सुनावणी संपताच साध्वी प्रज्ञा यांनी थयथयाट करण्यास सुरुवात केली. “मोडक्या खुर्च्या, धुळीने माखलेल्या खिडक्या अशा वातावरणात मला कसलीही मेडिकल रिअॅक्शन झाल्यास कोणाला जबाबदार धरायचे ? माझी तब्येत ठीक नाही हे माहित असतानाही मला इथे हजर राहण्यास सांगण्यात आले. पण, जर फक्त वकीलच बोलणार असतील तर मला इथे बसवून का ठेवले आहे ?”, असा सवाल आपल्याच वकिलांना करत साध्वी प्रज्ञा यांनी आपला संताप व्यक्त केला.

एनआयए न्यायालयात शुक्रवारी सुनावणी संपताच न्यायाधीश आपल्या दालनात निघून गेल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले. आपली तब्येत ठीक नसताना देखील आपल्याला सुनावणीसाठी हजर राहण्याची सक्ती करण्यात आली. एवढे असूनही न्यायालयात हजर राहिल्यानंतर मात्र आपल्याला बसायला धड जागा देखील मिळाली नाही. त्यामुळे चीड येऊन साध्वी प्रज्ञा यांनी आपली नाराजी, संताप आपल्याच वकिलांकडे व्यक्त केला. दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांची इच्छा नसतानाही न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना सुनावणीसाठी हजर राहावे लागले. त्यामुळे त्यांची ही चिडचिड झाली का ? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

संसदेच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ३ ते ७ जूनपर्यंत न्यायालयात गैरहजर राहण्याच्या परवानगीसाठी साध्वी प्रज्ञा यांनी केलेला अर्ज ३ जून रोजी एनआयए न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, गुरुवारी (६ मे) साध्वी प्रज्ञा यांची तब्येत अचानक बिघडली. साध्वी प्रज्ञा यांच्या आतड्याला संक्रमण झाल्याने कंबरदुखी आणि उच्च रक्तदाब वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे, साध्वी प्रज्ञा यांना एक किंवा दोन दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार होते. त्यामुळे त्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणार नाहीत, अशीही चर्चा सुरु होती. मात्र, न्यालयाच्या सक्त आदेशांमुळे साध्वी प्रज्ञा यांना न्यायालयात हजर राहावे लागले.

Related posts

जाणून घ्या… नवनीत राणा यांच्या अमित शहा भेटीमागचे कारण

News Desk

नाशिकहून निघालेला किसान मोर्चा स्थगित, सरकारकडून प्रमुख मागण्या मान्य 

News Desk

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk