HW News Marathi
राजकारण

पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणे गरजेचे, दया… कुछ तो गडबड है !

मुंबई | महाराष्ट्रासह देशभरात मंगळवारी (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी मतदान झाले. दरम्यान, या तिसऱ्या टप्य्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती पुण्यातील मतदानाच्या टक्केवारीची. पुण्यात केवळ ४९% इतकेच मतदान झाले. याच पार्श्वभूमीवर आज (२५ एप्रिल) शिवसेनेकडून देखील भाष्य करण्यात आले आहे. “पुण्यातील ५१ टक्के लोक मतदानाच्या दिवशी घरीच पडून राहिले. पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणे गरजेचे आहे. दया, कुछ तो गडबड है !”, असे म्हणत शिवसेनेकडून या प्रकरणी शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

पुण्यात मेट्रो येत आहे. सरकार पुण्यातील उद्योगवाढीसाठी झटत आहे. (पुण्यात आता गुन्हेगारीही वाढली आहे.) म्हणजे पुणे कुठेच मागे पडलेले नाही. तरीही पुणेकरांनी मतदानाच्या बाबतीत निराशा दाखवून घरीच बसणे पसंत केले. समाजाला दिशा देणारे महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, रँग्लर परांजपे, अण्णासाहेब कर्वे यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यासाठी पुण्यातच जन्म घेणे पसंत केले. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची ठिणगी याच मातीत टाकली व लोकांच्या मनात चेतना जागवली. त्याच पुण्यातील ५१ टक्के लोक मतदानाच्या दिवशी घरीच पडून राहिले. पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणे गरजेचे आहे. दया, कुछ तो गडबड है!

मतदानाचा तिसरा टप्पा सुरळीत पार पडल्याची विजयी तुतारी फुंकण्यात आली आहे. देशात सुमारे 64 टक्के तर राज्यात ६१ टक्के मतदान झाल्याचे सरकारी आकडे प्रसिद्ध झाले आहेत. म्हणजे जगातील सर्वात मजबूत, मोठय़ा, जागरूक वगैरे टेंभा मिरवणाऱया लोकशाहीत जवळजवळ ‘निम्म्या’ लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला दिसत नाही, त्यामागची कारणे काय असायची ती असोत, पण ज्यांनी मतदान केले नाही त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले नाही. मतदान करणे हीसुद्धा राष्ट्रीय भावना किंवा राष्ट्रवादच आहे व हेच लोक मतदानानंतर सगळय़ात जास्त रडगाणी गात असतात. सरकारला व राजकारण्यांना सल्ले देण्याचा ठेका याच मंडळींनी घेतलेला असतो. ग्रामीण आदिवासी, दुर्गम भागात निदान पन्नास टक्के तरी मतदान होते, पण पुण्यासारख्या शहरी भागात देशातील सगळय़ात कमी मतदान होत असेल तर त्याला काय म्हणायचे? विद्येचे माहेरघर, पुण्यनगरी वगैरे बिरुदावली मिरवणाऱया पुण्याचा मतदानाचा आकडा जेमतेम 49 टक्के इतकाच आहे. मतदानाच्या दिवशी म्हणे पुण्यात सकाळपासूनच सामसूम होती. पुणे हे ज्ञानी व शहाण्या लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे जसे ‘फुल शहाणे’ आहेत तसे दीड शहाणे, साडेतीन शहाणेदेखील परंपरेने आहेत; पण या सर्व शहाण्यांनी मिळून पन्नास टक्केही मतदान केले नाही. पुण्याचा लौकिक असा की, सर्वात जास्त शिकलेले आणि विद्वान लोक येथे राहतात. पुणेकर हे जन्मतःच शहाणे आहेत व इतरांनी शहाणपण शिकवले की ते अपमान समजतात. पुन्हा दुपारच्या सक्तीच्या विश्रांतीचा डाग त्यांच्या जीवनमानावर उडाला आहे. तो जात नाही व मंगळवारच्या घसरलेल्या मतदान टक्क्याने हा डाग अधिक गडद झाला आहे. पुण्यात हे असे का झाले? यावर

संशोधन करणे गरजेचे

आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात आंब्याची आवक वाढल्याचा हा परिणाम असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे किंवा पुणेकर शहराचे, देशाचे नव्हे, तर जगाचे राजकारण करतात, त्यामुळे जोशी, बापटांना मतदान करून वेळ का घालवायचा? असा सुज्ञ विचार पुणेकरांनी केलेला दिसतो. देशभरातून मतदारांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होण्यापासून ते ‘कुणाचेही बटण दाबले तरी मत कमळालाच जाते हो’ असेही तक्रारीचे कारण आहे, पण 51 टक्के पुणेकरांनी यापैकी कोणतीच तक्रार करून जागरूक मतदारांची लक्षणे दाखवली नाहीत. ही इतकी निराशा व उदासीनता पुणेकरांत का यावी? म्हणजे तिकडे गडचिरोलीसारख्या ‘नक्षलग्रस्त’ जिल्हय़ात 71.98 टक्के एवढे मतदान नोंदवले जाते आणि शहाण्यासुरत्या पुण्यात मात्र जेमतेम 49 टक्के मतदान होते. नक्षल्यांच्या हल्ल्यांची पर्वा न करता गरीब, आदिवासींनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले आणि पुणेकरांनी मात्र त्याच राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरवली. ज्या पुण्याने महाराष्ट्रात व देशात अनेक राजकीय चळवळी घडवल्या त्या पुणेकरांनी मतदानाच्या बाबतीत इतकी बेफिकिरी दाखवावी? पंतप्रधान मोदी यांनी सकाळीच मातृदर्शन घेऊन मतदान केले. मतदानाची शाई लावलेले बोट ते दिवसभर टी.व्ही.च्या छोटय़ा पडद्यावरून दाखवत होते. मी मतदान केले, तुम्हीही मतदानास चला. आपले मत म्हणजे जवानांच्या शौर्यास आणि बलिदानास मत असल्याचे मोदी वारंवार सांगत होते. तरीही शहाण्या पुणेकरांनी घरातच बसणे पसंत केले. कडक उन्हाच्या झळा त्यांना सहन झाल्या नाहीत, मतदान केंद्रांवरील रांगा व यंत्रांच्या गोंधळांचा त्यांना उबग आला की बोटास शाई लावून काय उपयोग असे शहाण्या पुणेकरांना वाटले? आम्हाला हेही नकोत आणि तेही नकोत. कोणीही निवडून आले तरी

सब घोडे बारा टक्के

व जो तो पुन्हा टक्केवारीचाच हिशोब करीत पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असे पुणेकरांना वाटले काय? पुणेकर शहाणे असल्याने कदाचित त्यांनी मतदानात भाग न घेण्याचा निर्णय घेतला असे गृहीत धरले तरी त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवायला हव्या होत्या. कारण मतदानास न जाणे हा काही स्वतःचा राग शांत करण्याचा मार्ग नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील अनेक गावांनी त्यांच्या मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांच्या गृहराज्यात हे घडले. दुष्काळाने होरपळलेल्या जामनगर, कच्छ आणि तापी जिल्हय़ांतील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. शेतकऱयांचे म्हणणे आहे की, मतदान करूनही प्रश्न सुटणार नसतील तर उपयोग काय? शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, पिकांचे नुकसान होऊनही सरकारची मदत नाही. अशा अनेक समस्यांनी निराश झालेल्या मतदारांनी शेवटी मतदानावरच बहिष्कार टाकला. अर्थात, आपला उद्रेक उघडपणे व्यक्त करायला ते विसरले नाहीत आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी मतदान केंद्रांवर जाण्याचे टाळले. पुण्यात असे काय घडले? वास्तविक, पुण्यात मेट्रो येत आहे. सरकार पुण्यातील उद्योगवाढीसाठी झटत आहे. पुण्यात ‘आयटी’ क्षेत्रात भरभराट सुरू आहे. (पुण्यात आता गुन्हेगारीही वाढली आहे.) म्हणजे पुणे कुठेच मागे पडलेले नाही. तरीही पुणेकरांनी मतदानाच्या बाबतीत निराशा दाखवून घरीच बसणे पसंत केले. समाजाला दिशा देणारे महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, रँग्लर परांजपे, अण्णासाहेब कर्वे यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यासाठी पुण्यातच जन्म घेणे पसंत केले. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची ठिणगी याच मातीत टाकली व लोकांच्या मनात चेतना जागवली. त्याच पुण्यातील 51 टक्के लोक मतदानाच्या दिवशी घरीच पडून राहिले. पुणेकरांच्या निराशेची चौकशी होणे गरजेचे आहे. दया, कुछ तो गडबड है!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे !

News Desk

मी निवडणुकीपूर्वीच आर्ट अटॅक येऊन मेलो का नाही | चंद्रकांत खैरे

News Desk

मुख्यमंत्री २९ नोव्हेंबरला विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मांडणार

News Desk