HW News Marathi
राजकारण

कमला मीलच्या सीबीआय चौकशीसाठी विखे पाटील जनहित याचिका दाखल करणार !

मुंबई मनपा आयुक्तांच्या निलंबनासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार कमला मीलमधील अग्नीतांडवाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे.

पुढील आठवड्यात ही याचिका दाखल केली जाईल. विखे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कमला मीलची आग व भीमा कोरेगावच्या घटनांवरून सरकारवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, सरकारने या घटनेच्या चौकशीची जबाबदारी मुंबई मनपा आयुक्तांवर सोपवली आहे. परंतु, ज्या घटनेसाठी महापालिकेचा भ्रष्टाचार,सरकारची उदासीनता आणि आयुक्तांची निष्क्रियता कारणीभूत आहे; त्या घटनेची चौकशी आयुक्तांकडे सोपवणे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या देण्यासारखे आहे.

खरे तर सर्वात पहिले आयुक्तांविरूद्ध 302दाखल करून त्यांना निलंबित करायला हवे होते, परंतु त्यांच्याकडेच चौकशी सोपवली जाते, ही वैचारिक दिवाळखोरी आहे. मनपा आयुक्त जाहीरपणे सांगतात की, अनधिकृत हॉटेल्सविरूद्धची कारवाई रोखण्यासाठी त्यांना एका राजकीय नेत्याचा फोन आला होता. परंतु, फोन करणाऱ्या नेत्याचे नाव त्यांनी अजूनही उघड केलेले नाही. याचाच अर्थ त्यांना संबंधितांचा भ्रष्टाचार दडपून ठेवायचा आहे.

त्या नेत्याचे नाव ते स्वतःहून सांगत नसतील तर आयुक्तांचा कॉल रेकॉर्ड तपासून ते नाव समोर आणले पाहिजे, मनपा आयुक्तांवर दबाव येतो,त्यानुसार ते नियमबाह्य निर्णय घेतात, भ्रष्टाचाराला दडवून ठेवतात आणि स्वतःच्या भ्रष्टाचारावरही पांघरूण घालतात, ही बाब त्यांना तात्काळ निलंबित करण्यास पुरेशी आहे, असे विखे पाटील म्हणाले. कमला मीलमधील हॉटेल्सची आग, साकिनाका येथील फरसाण मार्टची आग, घाटकोपर व भेंडीबाजारमधील इमारत कोसळण्याची घटना, अनेक स्टुडिओंना लागलेली आग, आदी सर्वच घटनांसाठी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार कारणीभूत आहे. त्यामुळे या सर्वच घटनांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची इत्यंभूत माहिती देण्यासाठी तसेच मनपा आयुक्तांचे निलंबन आणि मुंबईतील घटनांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यासंदर्भात सरकारला निर्देश द्यावेत, या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना कमला मीलचे प्रकरण दडपायचे आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील भाजप-शिवसेनेचे अनेक नेते, बेकायदेशीर हॉटेल्सचे मालक आणि मनपा अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. त्यामुळेच कमला मीलच्या आगीनंतर सुरू झालेली मनपाची कारवाई दोन दिवसातच बंद झाली.

कमला मीलमध्ये आग लागल्यानंतर मनपाने तात्काळ कारवाई करते, याचा अर्थ कुठे बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण आहे, याची माहिती मनपाला पूर्वीपासून होती. परंतु, प्रत्येक हॉटेलकडून दरमहा लक्षावधी रूपयांचा हप्ता दिला जात असल्याने कारवाई झाली नव्हती, असाही हल्लाबोल त्यांनी केला. मनपा आणि अग्नीशमन विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने मुंबईत रोज आगी लागत आहेत. परवा एकाच दिवशी आठ आगी लागल्या.

6 जानेवारीला कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओला आग लागली. मुंबईत साधारणतः 85 स्टुडिओ आहेत. हे सर्व स्टुडिओ मृत्यूचे सापळे झाले आहेत. अनेक स्टुडिओमध्ये मनपाची परवानगी न घेताच सेट उभारले जातात.यामध्ये आगीला पोषक असे साहित्य वापरले जाते, तात्पुरती बांधकामे केली जातात, आग नियंत्रणाचे नियम पाळले जात नाहीत, अग्नीशमनाची कोणतीही व्यवस्था केली जात नाही, सेटला आग लागली तर आपात्कालीन मार्ग नसतो,सेटला एकच प्रवेशद्वार असते. मुंबईत रोज अशा 150-200 सेटवर शुटिंग सुरू असते.

एका सेटवर किमान 60कामगार असतात. त्यातील बहुतांश जण रोजंदारीवर असतात. त्यांना कामगार कायद्याचे कोणतेही संरक्षण नसते. त्यांच्या आल्या-गेल्याची नोंदही नसते. त्यामुळे एखादी मोठी आग लागली आणि 5-10 कामगार जळून मृत्युमुखी पडले तर मृतदेह सापडेपर्यंत कोण आले आणि कोण गेले, याचा शोधही लागणार नाही, इतकी गंभीर परिस्थिती आहे. सिनेव्हिस्टाला लागलेल्या आगीत तब्बल 11 तासांनी एका कामगाराचा मृतदेह सापडला. तोपर्यंत कोणालाही त्या आगीत कोणी फसल्याची माहिती नव्हती, असेही विखे पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : देशभरासह महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान

News Desk

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk