HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#KnowYourNeta | जाणून घ्या…नागपूर मतदारसंघाबाबत !

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. भारतात लोकसभा निवडणूक म्हणजे सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव. कारण देशातील अगदी सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्चभ्रूंपर्यंत, सर्वच स्तरातील, वेगवेगळ्या वयोगटातील सर्वच जण याचा एक महत्त्वपूर्ण भाग असतात. काही जण वर्षानुवर्षे एका विशिष्ट पक्षाला, एका विशिष्ट व्यक्तीलाच मत देतात. तर काही जण एखाद्याचे काम पाहून किंवा त्यांच्या आश्वासनांना भाळून मत देतात. अनेकदा असे होते कि आपला पक्ष, आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार यांच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. मात्र, ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांच्या उमेदवारांची माहिती करून देणार आहोत. तेव्हा जाणून घ्या… कोण आहे तुमचा नेता ?

११ एप्रिलपासून देशभरात मतदानाला सुरुवात होत आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघासाठी हे मतदान पार पडणार आहे. त्याचा महाराष्ट्रातील पहिला टप्पा ११ एप्रिल तर शेवटचा टप्पा २९ एप्रिलला पार पडणार आहे. यामधील सर्वात आधी पहिल्या टप्प्यातील मतदार संघ आणि त्यातील उमेदवारांवर नजर टाकूया. पहिल्या टप्प्यात वर्धा, नागपूर, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या मतदारसंघांच्या निवडणूक होणार आहेत.

नागपूर मतदारसंघाची २०१४ सालची स्थिती

सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मतदारसंघाबाबत. नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत विधानसभेचे ६ मतदार संघ आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम, पूर्व, मध्य, पश्चिम, उत्तर, आणि दक्षिण. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी नागपूर येथील उमेदवार होते. भाजपचे नितीन गडकरी, कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार, बसपाचे मोहन गायकवाड, आपच्या अंजली दमानिया त्यापैकी विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ५,८७,७६७ मत मिळून विजय झाला होता. तर विलास मुत्तेमवार यांना ३,०२,९१९ मते मिळाली होती. गडकरी यांनी २,८४,८२८ मतांनी राज्यमंत्री मुत्तेमवर यांचा पराभव केला होता. यावेळी नागपूरमध्ये भाजपला ५४.१६ तर कॉंग्रेसला २७.९३ टक्के मते मिळली होती.

निधीचा वापर

नितीन गडकरी यांना एकूण २० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी त्यांनी १५.६५ कोटींचा निधी विकास कामांसाठी वापरला. तर ४.३५ कोटींचा निधी अर्खचित राहिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये देखील भाजपकडून नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी तर कॉंग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये रस्ते बांधणी तसेच मेट्रो प्रकल्प सुरु करण्यात गडकरींचा मोठा सहभाग राहिला आहे.

भाजप-शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा

महाराष्ट्रात २०१४ सालच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला होता. काँग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ ४ जागा राखल्या. तर यावेळी भाजप शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात सरळ लढत पाहायला मिळणार आहे. नितीन गडकरी यांच्याविरोधात उभे राहिलेले उमेदवार नाना पटोले हे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपकडूनच निवडून आले होते. आता त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून आता ते नितीन गडकरी यांच्याविरोधात उभे राहिले आहेत.

गडकरींच्या विकासपुरुषाच्या प्रतिमेला नाना पटोले कशी देणार टक्कर ?

विशेषकरून कुणबी-मराठा मतांवर नाना पटोले यांची चांगली पकड असल्याचे म्हटले जाते. डॉ. आंबेडकर यांची कर्मभूमी असलेली नागपूरमध्ये दलित वर्गाची भूमिकादेखील अत्यंत महत्वाची आहे. तर या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्यादेखील मोठी आहे. दरम्यान, गेल्या काही काळात नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी निर्माण केलेल्या आपल्या विकाससपुरुषाच्या प्रतिमेला नाना पटोले कशी टक्कर देतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related posts

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

News Desk

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

Gauri Tilekar

कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे कधी लपविले नाही, तरी देखील नागरिकत्वावरून वाद का ?

News Desk