HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#KnowYourNeta | जाणून घ्या…यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबत

देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडतील. तर महाराष्ट्रात एकूण ४ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडतील. सर्वसामान्य जनतेला आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार यांच्याबद्दल माहिती ही असायलाच हवी. म्हणूनच आम्ही तुम्हाला देत आहोत महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांच्या उमेदवारांची माहिती. तेव्हा आपले अमूल्य मत देण्याआधी जाणून घ्या… कोण आहे तुमचा नेता ?

सध्या आपण बोलत आहोत महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणूक समीकरणांबद्दल. ज्यामध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातील कोण कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या निकालानंतर काय चित्र होतं आणि आता २०१९ च्या निवडणूक निकालानंतर काय चित्र असू शकत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम मतदारसंघाबाद्दल. यवतमाळ-वाशिम मतदारसंघा अंतर्गत ६ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, वाशीम, कारंजा, आणि पुसद याचा समावेश होतो.

२०१९ सालचे उमेदवार कोण ?

यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून भावना गवळी तर कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, प्रहारकडून वैशाली येडे, बहूजन समाज पक्षाकडून अरुण किंनवटकर, वंचित बहूजन आघाडीचे प्रविण पवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले पी. बी. आडे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष व अपक्ष मिळून एकूण २४ उमेदवार या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.

२०१४ सालच्या यवतमाळ-वाशीमच्या लोकसभा निवडणूक निकालांवर

२०१४ मध्ये यवतमाळ-वाशिम या मतदार संघातून शिवसेनेच्या भावना गवळी उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे त्याचबरोबर बसपाचे बळिराम राठोड हे उभे होते. त्यावेळी शिवसेनेच्या भावना गवळी यांना ४,७७,९०५ मतं मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३,८४,०८९ मतं मिळाली होती. जवळपास ९३,८१६ एवढ्या मतांच्या फरकाने भावना गवळी विजयी झाल्या होत्या. तर बसपच्या बळिराम राठोड यांना ४८,९८१ मतं मिळाली होती. या मतांची टक्केवारी पहिली तर शिवसेनेला २७% कॉंग्रेसला २१% आणि बसपच्या पारड्यात केवळ २% मतं पडली होती.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील मतदारांची संख्या

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या जवळपास १७,५५,२९२ एवढी आहे. त्यापैकी एकूण पुरुष मतदारांची संख्या ९,२१,२७६ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ८,३४,०१० इतकी आहे.

मतदारांचा कौल कोणाला ?

या मतदारसंघातून २०१४ मध्ये शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या होत्या. गेल्या १० वर्षापासून येथील सत्ता शिवसेनेकडे आहे. लागोपाठ ४ वेळा भावना गवळी या लोकसभेत खासदार आहेत. मात्र तरीही त्यांना या मतदारसंघात हवा तसा विकास करता आलेला नाही, अशी प्रतिक्रिया येथील मतदार व्यक्त करतात. तर अपक्ष उभे राहीलेले पी.बी आडे हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते. आडे यांचा या भागात दांडगा जनसंपर्क असल्याचेही सांगितले जाते. यासोबतच प्रहार पक्षाकडून उभ्या राहिलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली येडे या देखील उभ्या आहेत. पहिल्यांदाच अशाप्रकारे उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला येथील मतदार कौल देतील की विद्यमान सत्तेकडेच मतदारांचे झुकते माप राहिल ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related posts

हाफिज सईद लढवणार निवडणुक

News Desk

राहुल गांधी यांची आज मुंबईत जाहीर सभा

News Desk

मतदान केल्यानंतर कुंभमेळ्यात स्नान केल्याचे भाग्य लाभते | पंतप्रधान मोदी

News Desk