HW News Marathi
राजकारण

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा! – राज ठाकरे

मुंबई | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा”, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाचकचे मुख्यमंत्रांकडून यांच्याकडून सतत वादग्रस्त विधान केली जात आहे. तर बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेली तोडफोडने राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी  ट्वीट केले आहे.

 

राज ठाकरेंनी ट्वीमध्ये  म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केले जातेय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असे वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावे.”

राज ठाकरे नेमके काय म्हणाले

मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत. ते तात्काळ थांबवा.

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधं सोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.

Related posts

योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी | अशोक चव्हाण

News Desk

“…किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Aprna

राजे करणार या पक्षाचे नेतृत्व ?

News Desk