मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकांना दोन पानी पत्र लिहिले आहे. या पत्रात सह्याद्री वाहिनी मराठी भाषेचे कार्यक्रम प्रसारित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत सर्व सामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. यासंदर्भात बातम्या देखील प्रसारित झाल्या आहेत. राज ठाकरे यांचे हे पत्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी काल (20 जुलै) प्रसार भवन येथील दूरदर्शनचे अप्पर महासंचालक असणाऱ्या नीरज अग्रवाल यांना दिले.
राज ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सहयाद्री तसंच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून दाखवला जातो आणि त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. पण कोशिश से कामयाबी तक, ‘तराने पुराने’ हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सहयाद्री वाहिनीवर दाखवले जातात आणि ते पुनः प्रसारीतही केले जात आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरून नाही.”
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/wpoRLhXuIs
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2022
राज ठाकरेंनी पत्रात नेमके काय म्हणाले
प्रति
मा. श्री. नीरज अग्रवाल,
अप्पर महासंचालक (पश्चिम विभाग),
दूरदर्शन आकाशवाणी,
प्रसारण भवन, ३ रा माळा,
एच.टी. पारेख मार्ग, मुंबई – ४०००२०.
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !
विषय :- दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवर मराठी भाषेतच कार्यक्रम प्रसारित करणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी…
महोदय,
दूरदर्शनने (आत्ताचे प्रसार भारती) दि. १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सहयाद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली, त्याचा उद्देश हा महाराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्हावे हा आहे. परंतु सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचे प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्व सामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. तसेच याबाबत महाराष्ट्र टाइम्स सारख्या अग्रगण्य मराठी दैनिकाने माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती घेतली असता त्यात ही बाब उघड झाली. तश्या प्रकारच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सहयाद्री तसंच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून दाखवला जातो आणि त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. पण कोशिश से कामयाबी तक, ‘तराने पुराने’ हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सहयाद्री वाहिनीवर दाखवले जातात आणि ते पुनः प्रसारीतही केले जात आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरून नाही.
आम्ही आपणांस एवढंच सांगू इच्छितो की, यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम; मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्र राज्यात आहेत, त्यामुळे मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचे भान सहयाद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. याबाबत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील दूरदर्शनच्या स्थानिक राजभाषाप्रेमी आणि आग्रही अशा प्रादेशिक वाहिन्यांकडून आपण योग्य तो बोध घ्यावा व सहयाद्री वाहिनीवर होणारा इतर भाषांचा प्रादुर्भाव वेळेत रोखावा, हीच एकमेव अपेक्षा.
आमच्या मागणीचा आपण जरूर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल.
आपला नम्र,
राज ठाकरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.