मुंबई । राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना बुधवारी (१ मे) गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १६ जवान शहीद झाले. दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू–कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि त्या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याचे नाव हे त्यांच्या जिहादी कनेक्शनची पुरावा असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, “काश्मीरमध्ये २ वर्षांत २००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करणारे आणि काश्मीर खोऱ्यातून ‘जैश–ए–मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण मिटविणारे केंद्रातील मोदी सरकार नक्षलवाद्यांचेही डोके ठेचण्यात यशस्वी होईल”, असा विश्वास देखील शिवसेनेने व्यक्त केला आहे.
काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?
आधी दंतेवाडा आणि आता जांभूरखेडा हे दोन्ही हल्ले म्हणजे नक्षल्यांनी वर काढलेले डोके आहे. ते आताच ठेचावे लागेल. कारण या डोक्यांमध्ये ‘जिहादी हवा’ भरण्याचेही उद्योग सुरू आहेत. नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू–कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि त्या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याचे नाव हा या कनेक्शनचा पुरावा आहे. कश्मीरमध्ये दोन वर्षांत दोनशेच्या वर दहशतवाद्यांचा खात्मा करणारे आणि कश्मीर खोऱ्यातून ‘जैश–ए–मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण मिटविणारे केंद्रातील मोदी सरकार नक्षलवाद्यांचेही डोके ठेचण्यात यशस्वी होईल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही.
नक्षलवाद्यांनी पुन्हा एक भयंकर हत्याकांड घडविले आहे. गडचिरोलीतील भूमी आमच्या शहीद जवानांच्या रक्ताने माखली आहे. ऐन महाराष्ट्र दिनीच नक्षल्यांनी राष्ट्रद्रोही डाव साधला आहे. जेमतेम तीन आठवडय़ांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा भागात नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भाजप आमदारासह काही जवानांचा बळी घेतला होता. आता गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ बुधवारी तसाच स्फोट घडविला गेला. या स्फोटात १६ जवान हुतात्मा झाले. हे सर्व जवान ‘क्वीक रिस्पॉन्स टीम’चे म्हणजे ‘जलद प्रतिसाद पथका’चे होते. या हल्ल्याने नक्षली आव्हान किती कठीण आहे हेच दाखवून दिले आहे. तसेच नक्षलविरोधी कारवायांमधील कच्चे दुवे आणि उणिवा पुन्हा चव्हाटय़ावर आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नक्षल्यांना या पथकाची ‘बित्तंबातमी’ होती हे स्पष्ट झाले आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. नक्षल्यांचे ‘गुप्तचर जाळे’ (इंटेलिजन्स नेटवर्क) सुरक्षा दलांपेक्षा कार्यक्षम आहे असाच याचा अर्थ. दंतेवाडा हल्ल्यात गाडय़ांच्या ताफ्यातील बरोबर भाजप आमदाराचेच वाहन नक्षल्यांनी उडवले होते. आता जांभूरखेडा हल्ल्यातही खासगी वाहनातून प्रवास करणारे ‘क्यूआरटी’चे जवान नक्षल्यांचे ‘लक्ष्य’ ठरले. वास्तविक, नक्षल्यांना थांगपत्ता लागू नये यासाठीच नक्षलविरोधी पथकातील जवानांची वाहतूक खासगी वाहनांमधून केली जाते. तरीही जांभूरखेडा येथे
नक्षल्यांनी त्यांना हवे ते
घडवून आणले. म्हणजेच हे जवान कोणत्या वाहनातून, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी प्रवास करणार आहेत याची ‘बित्तंबातमी’ नक्षल्यांना होती. ही गोपनीय गोष्ट नक्षल्यांना समजली कशी? ही माहिती त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली? हे देशद्रोही कोण? असे अनेक प्रश्न आहेत. सरकारी पातळीवरून त्यांची उत्तरे शोधली जातील, चौकशी करून कारवायांचे दंडुकेही आपटले जातील, पण हल्ल्यात हकनाक बळी गेलेल्या १६ जवानांचे काय? त्यांच्या उद्ध्वस्त संसारांचे काय? त्यांचे कच्चेबच्चे, पत्नी, माता-पिता या कुटुंबीयांचे काय? या प्रश्नांची उत्तरे सरकारच्या चौकशीतून मिळणार नाहीत आणि १६ जवानांचे जीवही परत येणार नाहीत. नक्षलवाद्यांच्या कारवायांना ‘ब्रेक’ लागला असे एक वातावरण देशात निर्माण होत असतानाच अचानक नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अत्याधुनिक शस्त्र्ाास्त्रs वापरू लागले आहेत. शक्तिशाली ‘आयईडी’ भूसुरुंगाचा स्फोट घडवून जवानांच्या रक्तामांसाचा चिखल करू लागले आहेत. नक्षल्यांनी पेरलेल्या ‘आयईडी’पासून बचाव कसा करायचा हा सुरक्षा जवानांसमोरील एक यक्षप्रश्न आहे आणि त्याचे बिनचूक उत्तर अद्यापि तरी सापडलेले नाही. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान अधिक आक्रमक करताना या प्रश्नाचेही उत्तर सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना शोधावे लागेल. जांभूरखेडय़ाचे
हत्याकांड म्हणजे
लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीत झालेले सर्वाधिक मतदान आणि येथे गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलेल्या ४०-४५ नक्षल्यांच्या मृत्यूचा बदला असल्याचे सांगितले जात आहे. दहशत पसरविणे हादेखील हेतू असणार हे उघड आहे. बुधवारी पहाटे याच भागात महामार्गाच्या कामासाठी आणलेली सुमारे ३६ वाहने नक्षल्यांनी पेटवून देत धुमाकूळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर ‘क्यूआरटी’च्या पथकाला तेथे बोलावण्यात आले होते. आता वाहने जाळणे हा नक्षल्यांच्या संपूर्ण कटाचा एक भाग होता का याचे उत्तर तपासातून मिळेल, पण महाराष्ट्र दिन रक्तलांच्छित करणाऱ्या नक्षल्यांविरुद्ध तेवढय़ाच कठोरपणे कारवाई करणे गरजेचे आहे. आधी दंतेवाडा आणि आता जांभूरखेडा हे दोन्ही हल्ले म्हणजे नक्षल्यांनी वर काढलेले डोके आहे. ते आताच ठेचावे लागेल. कारण या डोक्यांमध्ये ‘जिहादी हवा’ भरण्याचेही उद्योग सुरू आहेत. नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट आणि त्या संघटनेचा प्रमुख यासिन मलिक याचे नाव दिसणे हा या कनेक्शनचा पुरावा आहे. कश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत दोनशेच्या वर दहशतवाद्यांचा खात्मा करणारे आणि कश्मीर खोऱ्यातून ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण मिटविणारे केंद्रातील मोदी सरकार नक्षलवाद्यांचेही डोके ठेचण्यात यशस्वी होईल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.