दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. असे परखड मत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीय मधून व्यक्त केले आहे.
सामनाचे आजचे संपादकीय
मुंबई | प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आहेत. 2019 च्या निवडणुका ते एकत्र लढतील व ताकद दाखवतील अशी घोषणा उभयतांकडून झाली आहे. आंबेडकर-ओवेसी अधिकृतपणे एकत्र आल्यामुळे जनतेच्या मनातील संभ्रम संपला. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून 2019 सालात भाजपास मदत करतील. त्या दोघांचे एकत्र येणे हे हिंदुस्थानच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे. राज्यातील दलित आणि मुस्लिम मते एकत्र करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. दोघांची भाषा ‘सेक्युलर’ म्हणजे धर्मनिरपेक्षतेची असते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भूमिका व संविधान या त्रिसूत्रीशी दोघांचाही संबंध नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व दलित संघटनांना एकत्र आणून ऐक्याची तुतारी फुंकावी असे अनेकांना वाटत होते. आठवले गट, गवई गट, कवाडे गट, कांबळे गट व स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा वेगळा गट असे रिपब्लिकन पक्षाचे तुकडेताकडे झाले आहेत. या सर्व गटातटांना एकत्र आणून मोठा एल्गार करण्याची गरज असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसीबरोबर हातमिळवणी केली हे दलित बांधवांना रुचेल काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नव्हती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. हिंदू समाजातील रूढी, परंपरांनी दलित बांधवांवर शेकडो वर्षे अन्याय केला व बाबासाहेबांनी त्या
अन्यायाविरुद्ध बंड
केले, पण त्यांनी धर्मांध मुस्लिम संघटनांशी हातमिळवणी केली नाही. सहा कोटी दलित बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग करून नवा मार्ग स्वीकारण्याचे ठरवले तेव्हा ‘‘मुस्लिम धर्म स्वीकारा’’ ही पाकड्यांची ऑफर धुडकावून बाबासाहेबांनी देशाच्या मुख्य प्रवाहात राहणे पसंत केले. डॉ. आंबेडकर महामानव होते. त्या महामानवास छोटा करण्याचे प्रयत्न त्यांचेच वारसदार करतात तेव्हा वाईट वाटते. एमआयएम हा मुस्लिम लीगचा भ्रष्ट अवतार आहे व मुसलमानांच्या व्होट बँकेचे राजकारण करून देशात फुटीची बीजे रोवण्याचे त्यांचे काम सुरू आहे. ‘‘पंचवीस कोटी मुसलमान हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना दूर ठेवा, आम्ही हिंदूंच्या कत्तली करू’’ अशी कसाईछाप भाषा वापरणार्या ओवेसीशी हातमिळवणी करून प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजाला नव्या खड्ड्यात ढकलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी अमृताचा प्याला दिला. त्यात विष कालवण्याचे काम करू नका. अर्थात कोणी कितीही मांडीवर थापा मारल्या तरी दलित समाज व राष्ट्रवादी मुसलमान हा शहाणाच आहे. नव्या अभद्र युतीकडे तो वळणार नाही. महाराष्ट्रातील दलित संघटना या सत्ताधार्यांच्या दावणीला कायम बांधलेल्या असतात व समाजापेक्षा स्वतःचेच हित ते पाहत असतात. कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला जनाधार नाही व अस्मिता नाही. जातीधर्माच्या नावाने त्यांचे चांगभले सुरूच असते. प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेले त्यातून त्यांचाच
खरा चेहरा उघड
झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून दलित जनतेने जे भव्य स्वप्न पाहिले ते प्रकाश आंबेडकर पूर्ण करू शकले नाहीत. ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, पण म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे व राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे? पुन्हा रोटी, कपडा व मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहे? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे व आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे. त्यामुळे दलदल वाढली आहे. मुसलमानांच्या बाबतीतही वेगळे काही घडत नाही. दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. देश डबक्यात घालण्याचा हा प्रयोग आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. 2019 च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे. राजकारणाचे अर्थकारण झाले की, प्रवाह आटतात व डबकी तयार होतात. दुसरे काय सांगायचे!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.