HW News Marathi
राजकारण

चिता पेटत होती अन् सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती !

मुंबई | गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (१७ मार्च) निधन झाले. मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्यापासूनच गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरु होता, पर्रीकर यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव देखील आणला जात होता. मात्र, अखेरपर्यंत मनोहर पर्रीकर यांनी आपले पद न सोडता आपले कर्त्यव्य बजावले. शनिवारी (१६ मार्च) पर्रीकर यांची प्रकृती जास्त खालावली आणि काँग्रेसकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. त्यानंतर सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड उघड दिसली. अखेर भाजप नेते प्रमोद सावंत यांनी १८ मार्चला मध्यरात्री गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, गोव्यातील या संपूर्ण राजकारणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून जहरी टीका करण्यात आली आहे.

काय आहे आजचे ‘सामना’चे संपादकीय ?

फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण जणू मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते. चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती. निदान चार तास थांबायला हरकत नव्हती, पण सकाळपर्यंत काँग्रेसने ढवळीकर, सरदेसाईंना गळाला लावले तर काय करायचे? या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला. गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार? आम्ही फक्त सहानुभूतीचा उसासा सोडू शकतो.

मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव अनंतात विलीन झाले, पण त्यांच्या देहाची राख गोमंतकच्या भूमीत विलीन होण्याआधीच सत्ता-खुर्चीचा लाजीरवाणा खेळ सुरू झाला होता. अखेर हपापलेल्या बोक्याप्रमाणे आपापला वाटा घेऊन हा खेळ सोमवारी मध्यरात्रीनंतर संपला. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी मध्यरात्री प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली, तर विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून नेमले जाणार आहेत. लोकशाहीचा हा खेळखंडोबाच म्हणावा लागेल. पर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते. सोमवार मध्यरात्रीऐवजी मंगळवारची सकाळ उजाडली असती तर गोव्यावर असा कोणता डोंगर कोसळणार होता? पर्रीकर यांच्या निधनाने हा डोंगर आधीच कोसळला आहे व त्यांच्या पार्थिवावर वाहण्यात आलेल्या फुलांचे अद्याप निर्माल्य झालेले नाही, पण बकासुराप्रमाणे सत्तासुरांची वखवख वाढल्याने रात्रीच्या अंधारात सर्वकाही उरकून घेतले गेले. मंगळवारची पहाट उगवली असती तर कदाचित भाजपचे सरकार उडाले असते व ज्यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथा घेतल्या त्यातल्या एखाद्याने काँग्रेसच्या वळचणीला जाऊन हवे ते पदरात पाडून घेतले असते. मनोहर पर्रीकर यांच्या तोडीचा दुसरा नेता गोव्यातील भाजपात तयार होऊ शकला नाही. त्यामुळे या तडजोडी कराव्या लागत आहेत. 40 सदस्यांच्या विधानसभेत तीन जागा रिकाम्या आहेत. पर्रीकर यांच्या निधनामुळे आणखी एक जागा रिकामी झाली. भाजपचे फक्त 12 आमदार आहेत. भाजपपेक्षा काँग्रेस आमदारांचा आकडा मोठा आहे व पर्रीकरांची प्रकृती ढासळत असतानाच

काँग्रेसने राज्यपालांकडे

सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपची चिंता समजू शकतो. काँग्रेसचे आमदार 14, पण मुख्यमंत्रीपदासाठीचे दावेदार ‘सतरा’ असा घोळ असल्याने भाजपचे फावले. सरकार स्थापनेसाठी 19 आमदारांची गरज असल्याने गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रत्येकी तीन आमदारांचा व तीन अपक्षांचा पाठिंबा भाजपला मिळवावा लागला. आता विधानसभेत बहुमत आहे, पण सरकार किती टिकेल हा प्रश्न आहे. विजय सरदेसाई किंवा मगोचे सुदिन ढवळीकर यांच्या भूमिका व निष्ठा संशयास्पद आहेत. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसाढवळय़ा नवा डाव मांडायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. ढवळीकर यांना जसे एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे, तसे विजय सरदेसाई यांनाही व्हायचे आहे. भाजपास नव्याने पाठिंबा हवा असेल तर आमच्या तीनही आमदारांना मंत्री करा, अशी अट ढवळीकर यांनी टाकली व शेवटी स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेऊन त्यांचा बंडोबा थंडोबा झाला. विजय सरदेसाई यांचा कांगावा असा की, ‘आमचा पाठिंबा फक्त पर्रीकरांना होता, भाजपास नव्हता. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा.’ पण सरदेसाई यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. फक्त 19 आमदारांत हा खेळ सुरू आहे व गोव्याची देवभोळी जनता ही राजकीय भुताटकी हतबलतेने सहन करते आहे. आजही गोव्यातील जनता शोकात आहे व माजी संरक्षणमंत्री असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा सुरू होता आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरला असल्याचे

भानही सत्तातूरांना

नव्हते. काँग्रेसमधून बेडूकउडी मारलेले विश्वजीत राणे व प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही मुख्यमंत्री व्हायचे होते, पण नितीन गडकरी यांनी प्रमोद सावंत यांचे नाव पक्के केले. प्रमोद सावंत हे तरुण आहेत व त्यांचा राजकीय अनुभव तोकडा आहे. आयाराम – गयारामांच्या टोळय़ांना सांभाळत त्यांना मुख्यमंत्री म्हणून गोव्याचे राज्य सांभाळायचे आहे. त्यामुळे गोव्यात नवीन मुख्यमंत्र्यांनी आपले पाय सुरक्षित आणि घट्ट ठेवावेत. खेचाखेची कधीही होऊ शकते. फक्त 19 आमदारांत दोन उपमुख्यमंत्री नेमावे लागावेत ही नामुष्की आहे. आमच्या कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद नसेल, असे चार वर्षांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केले होते व महाराष्ट्रात शिवसेनेस उपमुख्यमंत्रीपद मिळू दिले गेले नाही. मात्र नंतर बिहारात एक, उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले. जम्मू-कश्मीरातही भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतले व आता फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण जणू मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते. चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती. निदान चार तास थांबायला हरकत नव्हती, पण सकाळपर्यंत काँग्रेसने ढवळीकर, सरदेसाईंना गळाला लावले तर काय करायचे? या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला. गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार? आम्ही फक्त सहानुभूतीचा उसासा सोडू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप हळूहळू सर्व मित्र पक्षांना संपवते! – शरद पवार

Aprna

#LokSabhaElections2019 : पहिल्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk

गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेले नाही !

News Desk