सामनाचे आजचे संपादकीय
कश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण कश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे. ‘‘कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा’’ असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे. साडेचार वर्षांत कश्मीरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर द्या!
कश्मीरातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाले असतानाच पाकड्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणखी एका अधिकार्याचा बळी घेतला आहे.सैनिकास वीरगती प्राप्त व्हावी, पण ती प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढताना. इथे युद्धाची, अतिरेक्यांशी दोन हात करण्याची संधी न मिळताच जवानांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या आहेत. त्यांच्या मृतदेहांची ओळख पटण्यापलीकडे आहे. अलीकडे आमचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यात कमी व मृत जवानांच्या शवपेट्यांना गुंडाळण्यातच जादा खर्च होत आहे. कोणतेही युद्ध नाही, पण एकाच वेळी 40 जवान गतप्राण होतात. हे गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदा झालेले नाही. उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. सरकार व जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, त्यांचे आत्मबल वाढविण्याची ही वेळ आहे, पण ‘सरकार’ विसरले असले तरी देशाची जनता काही गोष्टी विसरत नसते. काँग्रेस राजवटीत कश्मीरात अशा घटना घडल्या तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची वीरश्रीयुक्त भाषणे लोकांनी सोशल मीडियावर टाकून त्यांना त्यांच्याच भूमिकेचे स्मरण करून दिले आहे. ‘छप्पन्न इंचांची छाती’ हा शब्द कश्मीरसंदर्भातच आला. आमचे सैनिक कमजोर नसून दिल्लीत बसलेले सरकार लाचार आणि कमजोर असल्याचा घणाघात तेव्हा श्री. मोदी करीत होते. पाकिस्तानात
घुसून मारले पाहिजे
असा तेव्हा त्यांचा बाणा होता. या सगळ्याची लोक पंतप्रधान मोदी यांना आठवण करून देत आहेत. पुलवामा येथील हल्ल्यानंतरही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत, ‘‘हा हल्ला आम्ही विसरणार नाही आणि दहशतवाद्यांना माफ करणार नाही. दहशतवाद्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल!’’ श्री. मोदी व त्यांचे सरकार नेमकी कोणती किंमत पाकड्यांना चुकवायला लावते याची वाट सगळेच पाहत आहेत. पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला, उरीच्या लष्करी तळावर हल्ला झाला. आता पुलवामात तर रक्ताचे पाट वाहिले. याचा बदला म्हणून तुम्ही पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राइक की काय तो करणार असाल तर त्यास बदला म्हणता येणार नाही. मुळात पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्यातील चौक्यांवर हल्ले करणे म्हणजे पाकड्यांना धडा शिकवणे नव्हे. पाकिस्तानला धडा शिकवला तो इंदिरा गांधींनी. लाहोरपर्यंत फौजा घुसवून पाकचा तुकडाच पाडला. लाखावर सैन्याला गुडघे टेकायला लावले. पुलवामानंतर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य सैन्याला दिले. ‘‘वेळ, दिवस आणि स्थान सैन्याने ठरवायचे व बदला घ्यायचा’’ अशी मुभा मोदी यांनी सैन्यप्रमुखांना दिली. पुन्हा सर्जिकल स्ट्राइक अथवा मर्यादित युद्ध असे दोन पर्याय आहेत. त्यांनी ते खुशाल करावेत. कश्मीरातील परिस्थिती नेमकी काय आहे व युद्ध हाच एकमेव पर्याय आहे काय? पाकिस्तानबरोबरच्या युद्धास विरोध करणारे बगलबच्चे आपल्याच देशात आहेत. 1962 साली चीनबरोबरच्या युद्धास विरोध करणारे लालभाई होतेच व ते चीनच्या बाजूने प्रचार करीत होते. ही ‘सेक्युलर’ अवलाद आता पाकड्यांच्या बाजूने उभी राहील. कारण चीन आज पाकिस्तानचे बाळंतपण करीत आहे. पुलवामातील हल्ल्यास सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार नाही, इतरही काही घटक आहेत, असे डॉ. फारुख अब्दुल्ला सांगत आहेत. कालपर्यंत सीमेपलीकडून आतंकवादी घुसत होते. आज कश्मीरातील तरुण हिंदुस्थानच्या विरोधात नव्याने उभा ठाकला आहे. तरीही कश्मीरच्या गावागावांत
‘‘हिंदुस्थान झिंदाबाद’’चे नारे
देणारा जो वर्ग आहे तो दबून गेला आहे व त्याला कोणाचेही संरक्षण नाही. त्याच्याशी संवाद साधण्यात सरकार कमी पडत आहे. कश्मिरी जनता हिंदुस्थानी आहे, असे डॉ. अब्दुल्ला सांगतात. कश्मीर खोर्यातील जे प्रमुख लोक हिंदुस्थानच्या बाजूने आहेत त्यांना देण्यात आलेली सुरक्षा सरकारने काढून घेतल्याचा आरोप डॉ. अब्दुल्ला करतात व सरकार त्यावर गप्प आहे. आता सरकारने कश्मीरातील ‘हुरियत’ नेत्यांची म्हणजे फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली. हा झटका चांगला आहे. कश्मीरच्या निमित्ताने देशात ‘हिंदू-मुसलमान’, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ असा वाद निर्माण करून धार्मिक फाळणीच्या नावावर राजकीय लाभ म्हणजे निवडणुकांचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे, ती खरी ठरू नये. कश्मीरातील तरुण शिक्षण, रोजगार, प्रतिष्ठा यापासून ‘दूर’ जात आहे व तोच तरुण नाइलाजाने उपजीविका म्हणून स्वतःच्याच देशाविरुद्ध शस्त्र हाती घेत आहे. यावर काम करणे गरजेचे आहे. पाकिस्तान याचा फायदा घेत आला व घेत राहील. कश्मीरातील तरुणांना, मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाला अफझल गुरू, बुरहाण वाणीसारखे लोक स्वातंत्र्यसैनिक व जवळचे वाटतात, तितके आमचे पंतप्रधान मोदी का वाटत नाहीत? पंतप्रधान मोदी जेव्हा कश्मीरवासीयांना आपले वाटतील तेव्हा शांततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेलेले असेल. कश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण कश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे. ‘‘कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा’’ असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे. साडेचार वर्षांत कश्मीरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर द्या!
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.