HW Marathi
राजकारण

युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात !

मुंबई | निवडणुकांत फक्त राजकीय पक्ष उतरत नाहीत, तर ‘आयकर’, ‘ईडी’देखील उतरवले जातात व खेळात थरार निर्माण केला जातो. काँग्रेससाठी मध्य प्रदेश आणि कमलनाथ हेच निवडणुकीचे मुख्य स्रोत असावेत. तेथेच ‘बूच’ लावून काँग्रेसला हतबल करण्याचा हा खेळ आहे. इन्कम टॅक्स व ‘ईडी’वाले निवडणूक काळात सरकार पक्षाच्या लोकांवर धाडी घालत नाहीत. कारण कोणावर धाडी घालायच्या व घालायच्या नाहीत हे शेवटी सत्ताधारी ठरवत असतात. आज जे विरोधात आहे त्यांच्या सत्ताकाळातही यापेक्षा वेगळे घडत नव्हते. येथे न्याय-अन्यायाचा प्रश्न नाही. युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात. ज्यांच्या हाती ससा तोच पारधी हा आमच्या लोकशाहीचा खरा चेहरा आहे. विरोधकांवरील धाडी ही नित्याची बाब आहे. ऊर बडवून काय होणार? हा न संपणारा खेळ आहे. काल जात्यात होते ते आज सुपात आहेत आणि सुपातले जात्यात आहेत. निवडणूक आयोग आता काय करणार?, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडचा निवडणुकीच्या निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईनंतर भाजपवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

कोणावर धाडी घालायच्या व घालायच्या नाहीत हे शेवटी सत्ताधारी ठरवत असतात. आज जे विरोधात आहे त्यांच्या सत्ताकाळातही यापेक्षा वेगळे घडत नव्हते. युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात. आपल्या देशात लोकशाही फक्त नावाचीच असते. ज्यांच्या हाती ससा तोच पारधी हा आमच्या लोकशाहीचा खरा चेहरा आहे. विरोधकांवरील धाडी ही नित्याची बाब आहे. ऊर बडवून काय होणार? काल जात्यात होते ते आज सुपात आहेत आणि सुपातले जात्यात आहेत. निवडणूक आयोग आता काय करणार?

परदेशातील काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात आणू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला दिले होते. त्यातला किती पैसा परत आला ते कुणीच सांगू शकत नाही, पण काळा पैसा परदेशात नसून तो आपल्याच देशात आहे व आपल्या निवडणुका हीच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची गंगोत्री आहे. या गटारगंगेत सगळेच डुबक्या मारीत आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत ‘आयकर’ विभागाने सर्जिकल स्ट्राइक केले आहेत. मध्य प्रदेश, दिल्ली, गोवा अशा ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. जेथे धाडी टाकल्या त्या सर्व व्यक्ती व ठिकाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित आहेत. कमलनाथ यांचे नातेवाईक, काही अधिकारी यांच्यावर पडलेल्या धाडीत पाच-पंचवीस कोटी रुपयांची रोकड सापडली व पैशांची मोजदाद संपत नाही, असे चित्र दिसत आहे. बहुधा निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत ही मोजदाद व त्याबाबतच्या बातम्या सुरूच राहतील असे दिसते. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक घोषवाक्य बनवले आहे ते म्हणजे ‘अब होगा न्याय!’ काँग्रेससंबंधित मंडळींवर धाडी पडल्यावर मात्र ‘अब हो रहा है अन्याय’ अशी ओरड सुरू झाली आहे. भ्रष्टाचार व काळ्या पैशाचे गठ्ठे हा न्याय नाही. ती राजकारणातील विकृती आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांच्या खात्यात 72 हजार रुपये जमा करण्याची योजना जाहीर केली आहे. योजना चांगली आहे, पण त्यासाठी पैसा कोठून आणणार? असे विचारले तेव्हा त्यांनी अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या मंडळींनी देश कसा लुटला व नरेंद्र मोदींमुळे या मंडळींना हजारो कोटींचा लाभ कसा झाला ते सांगितले. हा काळा पैसा रोखू असे त्यांनी सांगितले. कमलनाथ यांच्या जवळच्या व्यक्तींकडे सापडलेले ‘घबाड’ याबाबतही त्यांना आता बोलावे लागेल. मध्य प्रदेशात पडलेल्या धाडी सहज पडलेल्या नाहीत.

त्यामागे राजकीय सुसूत्रता

आहे. निवडणुका आता काळ्या पैशांवरच लढवल्या जातात व हा पैसा जे सत्तेवर असतात त्यांच्या चरणाशीच येऊन पडतो. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या आधी ‘नोटा’बंदीचा निर्णय झाला व त्यामागे राजकीय कट असल्याचे सांगितले गेले. सरकारविरोधी लोकांकडे वा राजकीय पक्षांकडे जी रोकड आहे त्याचा कचरा व्हावा व निवडणुकीत कुणाकडेही पैशांची ताकद असू नये या हेतूने नोटाबंदी केली असा आरोप त्यावेळी झाला. मायावती, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू अशा विरोधी मंडळींवर आता आयकर विभाग व ‘ईडी’च्या धाडी पडल्या. डी.एम.के.चे नेते स्टॅलिनसुद्धा या धाडसत्रातून सुटले नाहीत. हे खरे असले तरी ‘ईडी’, ‘आयकर’ ही खाती निवडणूक काळातच नव्हे तर इतर वेळीही सरकारचे राजकीय हत्यार म्हणूनच वापरली जातात. आजवरच्या सर्वच सरकारांमध्ये हे चित्र दिसले आहे. त्यामुळे त्याविरोधात ओरडण्याचा नैतिक अधिकार तसा कोणत्याही पक्षाला नाही. निवडणुकांत फक्त राजकीय पक्ष उतरत नाहीत, तर ‘आयकर’, ‘ईडी’देखील उतरवले जातात व खेळात थरार निर्माण केला जातो. पंधरा दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी हे अरुणाचल प्रदेशात सभेसाठी गेले. त्या वेळी मुख्यमंत्री पेमा खंडुरी यांच्या ताफ्यातील एका गाडीत एक कोटी ऐंशी लाख रुपयांची रोकड सापडली व त्यावर काँग्रेसने रान उठवले. भाजप निवडणुका लढवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत असल्याची बोंब ठोकली. आता काँग्रेसच्या तंबूत त्यापेक्षा शंभरपट रक्कम पकडली. म्हणजे काँग्रेसने पाच जोडे मारले तर भाजपने शंभर जोडे मोजून मारले. निवडणूक हे युद्ध आहे व एकमेकांच्या तंबूच्या

कनाती कापण्याचे प्रकार

शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू राहतील. निवडणुका पैशांवर लढवल्या जातात. त्यामुळे कोणाकडे किती व कोठून पैसा येतोय यावर एकमेकांच्या गुप्त नजरा आहेत. पैसा पकडला की समोरचा उमेदवार पांगळा पडतो हे त्यामागचे सूत्र असते. सत्तेवरचा प्रत्येक पक्ष हेच सूत्र पकडत असतो. काँग्रेससाठी मध्य प्रदेश आणि कमलनाथ हेच निवडणुकीचे मुख्य स्रोत असावेत. तेथेच ‘बूच’ लावून काँग्रेसला हतबल करण्याचा हा खेळ आहे. इन्कम टॅक्स व ‘ईडी’वाले निवडणूक काळात सरकार पक्षाच्या लोकांवर धाडी घालत नाहीत. कारण कोणावर धाडी घालायच्या व घालायच्या नाहीत हे शेवटी सत्ताधारी ठरवत असतात. आज जे विरोधात आहे त्यांच्या सत्ताकाळातही यापेक्षा वेगळे घडत नव्हते. येथे न्याय-अन्यायाचा प्रश्न नाही. युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात. सत्ता टिकविण्यासाठी हव्या त्या मार्गाचा अवलंब करा, हा आपल्या लोकशाहीचा मंत्र झाल्याने सगळय़ांचेच ताळतंत्र सुटले आहे. सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर होत आहे व विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी धाडी पडत असल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. खरे तर हा आरोप ममता बॅनर्जी यांनी करावा हे आश्चर्यकारकच आहे. सरकारी यंत्रणांचा राजकीय गैरवापर विरोधकांना खतम करण्यासाठी सर्वात जास्त कोठे होत असेल तर तो तामीळनाडू आणि प. बंगालमध्ये, असे इतिहास सांगतो. शेवटी आपल्या देशात लोकशाही फक्त नावाचीच असते. ज्यांच्या हाती ससा तोच पारधी हा आमच्या लोकशाहीचा खरा चेहरा आहे. विरोधकांवरील धाडी ही नित्याची बाब आहे. ऊर बडवून काय होणार? हा न संपणारा खेळ आहे. काल जात्यात होते ते आज सुपात आहेत आणि सुपातले जात्यात आहेत. निवडणूक आयोग आता काय करणार?

Related posts

सरकारने कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे !

News Desk

उभ्या आयुष्यात इतका भित्रा, कमकुवत पंतप्रधान पाहिला नाही !

News Desk

इंजिनीअरिंगच्या निम्म्या वर्गांना कुलूप लागण्याला जबाबदार कोण ? – उद्धव ठाकरे

News Desk