HW News Marathi
राजकारण

अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपायला हवा !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या १८ विजयी खासदारांसह रविवारी (१६ जून) अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा अयोध्या राम मंदिर प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, “आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर व्हावे हि लोकांची इच्छा आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. याच, पार्श्वभूमीवर सामनामधून आज पुन्हा (१८ जून) एकदा राम मंदिर प्रकरणी शिवसेनेकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. “३५० खासदारांचे बहुमत हाच राम मंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा”, असे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही?

ठरल्याप्रमाणे आम्ही 18 खासदारांसह अयोध्येत जाऊन आलो. मागच्या नोव्हेंबर महिन्यातही आम्ही अयोध्येत होतो. तेव्हा एका वेगळय़ा तयारीने आलो होतो. महाराष्ट्रातून आणि देशभरातून हजारो शिवसैनिक अयोध्येत आले तेही शक्तिप्रदर्शन नव्हते व आज 18 खासदारांसह रामलल्लांच्या दर्शनास पोहोचलो तेसुद्धा शक्तिप्रदर्शन नाही. मागच्या भेटीतच आम्ही हे सांगितले होते. ‘निवडणुकांचा घंटानाद सुरू आहे म्हणून आम्ही अयोध्येत आलेलो नाही. ‘निवडणुकीनंतर सर्व विजयी खासदारांसह रामलल्लांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ’ हा आमचा शब्द होता व ठरल्याप्रमाणे आम्ही आलो. खरे तर अयोध्यावासीयांचे म्हणा नाही तर रामलल्लांचे, पण आमचे ठरले आहे. आम्ही अयोध्येत येत राहू असे आमचे ठरले आहे. श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे 18 खासदार निवडून दिले. प. बंगालात भाजपची ताकद तोळामांसाचीच, पण रामविरोधकांना धडा शिकविण्यासाठीच बंगाली जनतेने

विजयाचा रसगुल्ला

भाजप तोंडी भरवला. उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या 61 खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. हे प्रभू श्रीरामाचे भांडार आहे. ते भाजप-शिवसेनेला प्रसाद म्हणून मिळाले. आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान यांनाही ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली राममंदिरापासून दूर पळता येणार नाही. त्यांच्या यशातही रामनामाचा वाटा आहेच. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. राममंदिराचा विषय कोर्टात अडकला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय काय तो निर्णय देईल ते नंतर पाहू. कायद्याच्या चौकटीत राहून राममंदिराचा प्रश्न सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगतात. पंतप्रधान म्हणून त्यांना कायद्याचीच भाषा करावी लागेल हे समजून घेतले पाहिजे, पण मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. ते छुपे हिंदुत्ववादी नसून उघड हिंदुत्ववादी आहेत. निवडणुकीआधी ते केदारनाथला जाऊन गुहेत तपासाठी बसले. देशातल्या ढोंगी निधर्मीवाद्यांना काय वाटेल याची पर्वा न करता ते

केदारनाथच्या गुहेत

बसले. दोन दिवसांपूर्वी ते केरळातील गुरुवायूर मंदिरात गेले. तेथे ते पितांबर नेसून पूजा-अर्चा करीत होते. हे त्यांचे रूप देशातील हिंदू जनतेस भावले. त्याचे पडसाद मतपेटीत उमटले. त्यामुळे मोदी-शहा यांच्या धमन्यांत राममंदिराचा विषय उसळत असेल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. मंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे. भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमच्या आधी एक दिवस अयोध्येत होते. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख संत नृत्य गोपालदास महाराजांच्या जन्मउत्सवात अयोध्येतील सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत केशव प्रसाद यांनी सांगितले, ‘‘रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याचे दोनच पर्याय आहेत. मुस्लिम पक्षकारांशी चर्चा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. हे दोन्ही पर्याय विफल झाले तर अध्यादेश काढून कायदा बनवून राममंदिराचे निर्माण व्हावे!’’ यावर जमलेल्या सर्व साधुसंतांनी विजयाचा शंखनाद केला. केशव प्रसाद हे साधे गृहस्थ नाहीत. त्यांचे बोलणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. आमच्या व त्यांच्या भूमिकेत तफावत नाही. चर्चेचे सर्व मार्ग विफल झाले आहेत व सर्वोच्च न्यायालय श्रद्धेचा निवाडा कसा करणार, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे 350 खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला 350 खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, दिवसभरातील सर्व सभा उशिराने

News Desk

RamMandir : अयोध्येतील व्यापाऱ्यांच्या विरोधाची तलवार म्यान

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…रावेर मतदारसंघाबाबत

News Desk