नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे काल (२२ मार्च) संसदेत पडसाद उमटले. भाजप खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं. खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांना सावंत यांनी उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेवर त्यांचा राग असण्याच्या कारणांचाही त्यांनी उलगडा केला.
खासदार अरविंद सावंत म्हणाले,”हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं हे साफ खोटं आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर बघितलं, तर जेव्हा केव्हा त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलं नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?,” असं सावंत म्हणाले.
“आज सभागृहात झाल्याचं त्यांचं काही म्हणणं आहे. तर आज महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्यासाठी भाजपाचे खासदार बोलत होते. त्यामुळ आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या समोरील हौद्यात (वेल) गेलो होतो. घोषणा देत होतो. जाताना मी जर त्यांना असं बोललो, तर मी तिथं थांबायलाही हवं होतं ना. त्यांच्या आजूबाजूला लोकं बसलेली असतात. त्यांना विचारावं. अशी भाषा मी वापरेल का? माझ्याकडून असं आयुष्यात होणार नाही. त्या एक महिला आहेत. अशी कामं आम्ही करत नाही,” असं सावंत म्हणाले.
“उलट त्यांना अशी सवयच आहे. त्या ज्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. तिथे पूर्वी शिवसेनेचे खासदार होते, आनंदराव आडसूळ. त्यांनी त्यांच्यावर (नवनीत राणा) गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामुळे त्यांच्या मनात राग आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून तो गुन्हा दाखल केलेला आहे. ते आता न्यायालयात आहे. त्यामुळे त्या सातत्यानं जेव्हा केव्हा बोलतात त्या उद्धव ठाकरे यांना अवमानित करतात. मी त्यांना अनेक वेळा बोललोय की, कुणावरही वैयक्तिकरित्या किंवा नाव घेऊन टीका करत जाऊ नका. आजही बघा”.
“सभागृहात कुणाचंही नाव घ्यायचं नाही म्हणून सभागृहात टोकलं जातं. कारण ते नोंदलं जातं. हे सगळं बघितलं की वाईट वाटतं. मी कधीही महिलांना धमकावलं नाही. लोक सरळ सरळ खोटं बोलू शकतात, याचंही मला आश्चर्य वाटतंय. काही लोकांकडे कौशल्य असतं की, एखाद्या गोष्टीवरून प्रसिद्ध मिळवणं. त्यांचा मागील एक दीड वर्षांचा काळ बघा. अॅसिड फेकण्याचं कृत्य कधीच करणार नाही, पण जर कुणी करत असेल, तर मी नवनीत राणांच्या बाजूने उभा राहिलं,” असं म्हणत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळून लावला आहे.
लोकसभेच्या लॉबीमध्ये अरविंद सावंत यांनी मला धमकावले ! – नवनीत राणा
नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. आपण राज्यातील महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत आवाज उठवल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप या पत्रामध्ये नवनीत राणा यांनी केला आहे. आपल्या या पत्रात नवनीत राणा म्हणतात की, “शिवसेना खासदार अरविंद सावंत हे लोकसभेच्या लॉबीमध्ये मला म्हणाले की तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी पाहतो. आणि तुलाही तुरुंगात टाकू”, असे म्हणत अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.