HW News Marathi
राजकारण

मोदी है तो मुमकीन है ! जमिनीवर आणि अंतराळातसुद्धा !

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करत भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील ‘लो अर्थ ऑरबिट’मधील लाइव्ह सॅटेलाईट पाडण्यात यश आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (२८ मार्च) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने “मोदी है तो मुमकीन है! जमिनीवर आणि अंतराळातसुद्धा!”, असे म्हणत पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. एरवी युतीत असूनही भाजप आणि पंतप्रधान मोदींवर वारंवार निशाणा साधणाऱ्या शिवसेनेकडून चक्क मोदींची प्रशंसा करण्यात आली आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

हिंदुस्थानच्या उपग्रहवेधी क्षेपणास्त्राद्वारे (ऍण्टी सॅटेलाइट मिसाईल) एक उपग्रह पाडण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश आले. हिंदुस्थान कालपर्यंत परमाणू शक्ती होता. इंदिरा गांधींपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सर्वांनी हिंदुस्थानला परमाणू शक्ती बनविण्यासाठी शर्थ केली, पण मोदी यांच्या काळात आपण अंतरिक्ष महाशक्ती बनलो आहोत. पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीत हा झेंडा फडकला याचा आम्हाला आनंद आहे. मोदी है तो मुमकीन है! जमिनीवर आणि अंतराळातसुद्धा!

पंतप्रधान मोदी देशवासीयांना संदेश देण्यासाठी टीव्हीवर येणार म्हटलं की, छाती धडधडत असते. पोटात गोळा येऊन हातापायांना कापरे भरत असते. कारण मोदी नेमका कोणता धक्का देणार याबद्दल सर्वांनाच एक प्रकारची धडकी भरत असते. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी अशाच धक्कातंत्राने घेतला होता. 500 आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याची मोठी घोषणा मोदी यांनी केली होती. आता देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सरकार कुठलाही धोरणात्मक अथवा राजकीय निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे अचानक मोदी देशाला पुन्हा कोणता ‘संदेश’ देत आहेत याबद्दल देशभरातच मोठी उत्सुकता होती. साहजिकच पंतप्रधानांचा हा संदेश ऐकण्यासाठी बुधवारी दुपारी सगळेच जण स्वतःला आवरून सावरून बसले होते. पंतप्रधान मोदी हे नक्की कोणता संदेश देणार आहेत, पंतप्रधान कोणती घोषणा करणार आहेत याबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता. अनेकांनी असा कयास मांडला की, मध्यरात्री लष्कराचे कमांडो पाकिस्तानच्या हद्दीत घुसले. त्यांनी या कानाची खबर त्या कानास लागू न देता अजहर मसूदला ठार केले व त्याचा मुडदा गुजरातच्या अरबी समुद्रात आणून बुडवला. कुणी असाही

अंदाज मांडला की,

विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या एका रात्रीत मुसक्या बांधून एकाच विमानातून त्यांचे गाठोडे दिल्ली विमानतळावर उतरवले आहे. अंदाज तर असाही होता की, दाऊद इब्राहिमचा ताबा घेतला असून त्यास जेरबंद करून मुंबई-दिल्लीत आणले आहे. काही जणांची वैचारिक झेप इथपर्यंत गेली की, राहुल गांधी यांनी ‘न्याय’ योजना जाहीर करून महिलांच्या बँक खात्यात सालाना 72 हजार रुपये जमा करण्याच्या योजनेवर हल्ला करून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याच्या योजनेस मोदी नव्याने चालना देतील, पण यापैकी कोणतीही घोषणा न करता पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना गर्व वाटेल अशी घोषणा केली. अंतराळ विज्ञानात हिंदुस्थानने बुधवारी एक गरुडझेप घेतली. आमच्या वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 कि.मी. दूर एलईओमध्ये (Low Earth Orbit) एका लाईव्ह सॅटेलाईटवर हल्ला करून त्याला उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानच्या उपग्रहवेधी क्षेपणास्त्राद्वारे (ऍण्टी सॅटेलाइट मिसाईल) एक उपग्रह पाडण्यात आपल्या वैज्ञानिकांना यश आले. अशा स्वरूपाची कामगिरी करणारा हिंदुस्थान हा जगातील चौथा देश ठरल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. ही बाब देशासाठी अभिमानाची आहे. अमेरिका, चीन, रशियानंतर आपण ही कामगिरी बजावली व त्याबद्दल देशाच्या

वैज्ञानिकांचे अभिनंदन

करावे तेवढे थोडेच! हिंदुस्थान कालपर्यंत परमाणू शक्ती होता. इंदिरा गांधींपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सर्वांनी हिंदुस्थानला परमाणू शक्ती बनविण्यासाठी शर्थ केली, पण मोदी यांच्या काळात आपण अंतरिक्ष महाशक्ती बनलो आहोत. देशाच्या वैज्ञानिकांनी हे सर्व घडवून आणले. ‘मिशन शक्ती’च्या नावाने हे यश मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांत देशाने केलेल्या प्रगतीवर बुधवारच्या या अंतरिक्ष यशाने कळस चढला. 2008 मध्ये आमच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान तर 2013 साली ‘मंगळयान’ अवकाशात सोडले. पंडित नेहरूंच्या काळात ‘इस्रो’सारख्या (Isro) संस्था स्थापन झाल्या व त्यातील वैज्ञानिकांनी आज हिंदुस्थानचा तिरंगा अंतरिक्षात फडकवला. पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीत हा झेंडा फडकला याचा आम्हाला आनंद आहे. पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकांच्या धामधुमीत चांगली बातमी दिली. एकमेकांवर चिखलफेक आणि आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. कुणी कुणाविषयी बरे बोलायला तयार नाही. अशात पंतप्रधान मोदी समोर येतात व देशाच्या वैज्ञानिकांनी अंतराळात बजावलेल्या कामगिरीची विजयी तुतारी फुंकतात हे आनंददायक आहे. मोदी है तो मुमकीन है! जमिनीवर आणि अंतराळातसुद्धा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापैकी कोण निवडणूक लढवणार?

Aprna