HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे म्हणाले, हे बरे नाही !

गोकुळ ही मलईदार संस्था आहे व या मलईतून मोठे राजकारण घडत असते. वास्तविक राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहेत. त्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात राडेबाजी झाली. म्हणजे दूधही चढते, असे आता म्हणावे लागेल. कोल्हापुरातील तालमी जगविख्यात आहेत, आता तेथील दुधाचा आखाडा झाला, हे बरे नाही. असे मत शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीय मधून व्यक्त केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

महाराष्ट्राचे समाजमन किती अस्थिर झाले आहे, बिथरले आहे व या बिथरलेल्या मनाचा राजकीय फायद्यासाठी कसा वापर केला जातो ते कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघातील राडेबाजीवरून दिसले. महाराष्ट्रात काय चालले आहे व राज्याचे चरित्र कसे बदलत आहे ते दाखविणाऱ्या अनेक घटना अलीकडे रोज घडत आहेत. शिक्षकांच्या सभांमध्येही राडेबाजी होताना दिसते आणि ते गंभीर आहे. तशीच गोकुळ दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणारी राडेबाजी अस्वस्थ करणारी आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. चप्पलफेक आणि खुर्चीफेक झाली. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली गेली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ‘मल्टिस्टेट’ करण्यावरून हा संघर्ष पेटला आहे. कोल्हापूर व आसपास गोकुळचे साम्राज्य आहे. ज्याच्या हाती गोकुळ तो कोल्हापूरच्या राजकारणात तालेवार ठरत असतो. विधानसभा, लोकसभा, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ‘गोकुळ’ची यंत्रणा जोरदारपणे काम करीत असते. ‘गोकुळ’ ठरवेल तेच अनेकदा घडत असते. त्यामुळे कालच्या राडय़ाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकशाहीत अशा राडय़ांना महत्त्व नसले तरी

असे राडे करून

गोंधळ निर्माण करण्यामागेही राजकारण असते. ‘गोकुळ’ला ‘मल्टिस्टेट’ करण्यामुळे राजकीय पक्षांमध्ये वाद उफाळून यावेत आणि त्याचे पडसाद लोकसभा-विधानसभा निवडणुकीत उमटावेत अशी कोणाची सुप्त इच्छा आहे का? ‘मल्टिस्टेट’वरून कोल्हापूर, सांगली आणि उत्तर कर्नाटकच्या राजकारणातही तरंग उमटत आहेत. त्याचा राजकीय लाभ व्हावा म्हणूनही या गोकुळच्या सभेत राडेबाजी होऊ दिली गेली का? शिवाय ‘मल्टिस्टेट’ झाल्याने इतर राज्यांतील मंडळीदेखील सदस्य होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक सदस्यांचा ‘राजकीय प्रभाव’ कमी करण्याचा हेतूही या संपूर्ण प्रकरणामागे आहे का? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरित आहेत. ‘गोकुळ’च्या राडय़ाने कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, याची माहिती असतानाही या प्रश्नी सरकारने हस्तक्षेप का केला नाही? कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे एरवी अनेक विषयांवर मतप्रदर्शन करीत असतात व कठोर कारवाईची भाषा करीत असतात; पण त्यांच्याच जिल्हय़ातील ‘गोकुळ’च्या सभेतील राडेबाजी ते थांबवू शकले नाहीत. रविवारच्या सभेत ‘मल्टिस्टेट’चा ठराव येणारच होता व तो गोंधळात मंजूर करून घेतला तर विरोधक तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी

शक्तिप्रदर्शन करणार

हे सगळय़ांनाच माहीत होते, पण तरीही व्हायचा गोंधळ झालाच. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता, पण पोलिसांसमोर हाणामाऱ्या झाल्या, तोडफोड झाली. या प्रश्नी पक्षापक्षात दोन-दोन गट पडले आहेत. पक्षांची बंधने मोडून गोकुळवरील वर्चस्वाची लढाई वर्षानुवर्षे सुरू आहे. काँग्रेसमध्ये दोन गट, राष्ट्रवादीत दोन गट. कोल्हापुरात शिवसेनेची राजकीय ताकद आहे व सहकार क्षेत्र व दूध उत्पादक संघाशी संबंधित शिवसेना आमदारांची एक स्वतंत्र भूमिका आहे, पण सर्वसाधारण सभेत ती मांडू दिली गेली नाही. त्यातून ठिणगी पडली. ‘गोकुळ’ हे एक स्वतंत्र राज्य आहे व तेथे सरकार किंवा राजकीय पक्षांचे काही चालत नाही असा भ्रम आहे. येथे आर्थिक गणिते महत्त्वाची आहेत. गोकुळ ही मलईदार संस्था आहे व या मलईतून मोठे राजकारण घडत असते. वास्तविक राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अनिर्णित अवस्थेत आहेत. त्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात राडेबाजी झाली. म्हणजे दूधही चढते, असे आता म्हणावे लागेल. कोल्हापुरातील तालमी जगविख्यात आहेत, आता तेथील दुधाचा आखाडा झाला, हे बरे नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

डिवचायचा प्रयत्न होणार पण तुम्ही शांत रहा !

News Desk