HW News Marathi
राजकारण

कमीत कमी बोला अन् बुधवारचे धक्के पचवून उभे रहा, शिवसेनेचा भाजपला सल्ला

मुंबई । भाजपसाठी बुधवार (१० एप्रिल) काहीसा धक्का देणाराच ठरला. एकीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समक्ष पक्षांतर्गत झालेला गोंधळ, ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणली गेलेली स्थगिती आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने ‘राफेल’बाबत पुन्हा सुनावणी देण्याची दाखविलेली तयारी हे सारं काही भाजपला चिंतेत टाकेल असंच आहे. त्यामुळे आता शिवसेनेने भाजपला एक मोलाचा सल्ला दिला आहे. “संरक्षणमंत्र्यांपासून सगळेच ‘राफेल’ प्रकरणाचा निकाल येताच भांबावल्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याचाच धोका आहे. त्यामुळे कमीत कमी बोला असा आमचा सल्ला आहे. बुधवारचे धक्के पचवून उभे राहावे लागेल”, असे आज (१२ एप्रिल) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये म्हणण्यात आले आहे.

काय आहे आजचे ‘सामना’चे संपादकीय ?

राफेल, ‘मोदी’ चित्रपटावर बंदी व ‘नमो’ टीव्हीचे प्रसारण थांबविणे या धक्क्यांनंतर भाजपला बुधवारी बसलेला चौथा धक्का महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत राडेबाजीचा होता. अशा हाणामाऱ्यांना फक्त मतभेद म्हणून सोडून देता येणार नाही. निदान राफेलबाबत तरी संयमाने बोलणे गरजेचे आहे. संरक्षणमंत्र्यांपासून सगळेच ‘राफेल’ प्रकरणाचा निकाल येताच भांबावल्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याचाच धोका आहे. त्यामुळे कमीत कमी बोला असा आमचा सल्ला आहे. बुधवारचे धक्के पचवून उभे राहावे लागेल.

बुधवारचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी बरा नव्हता. राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दणका दिला. राफेल खरेदी व्यवहारात पूर्वीच्या निकालांना आव्हान देणाऱया याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या व आता त्यावर पुन्हा सुनावणी होईल. या व्यवहारातील गोपनीय कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून गहाळ झाली किंवा चोरीस गेली. ‘द हिंदू’ने ती प्रसिद्ध केली. ही चोरलेली कागदपत्रे पुरावा म्हणून स्वीकारावीत असे याचिकाकर्त्यांनी म्हटले. न्यायालयाने ते मान्य केले आहे. त्यामुळे राहुल गांधी व भाजप विरोधकांना ऐन निवडणुकीत हाती कोलीत मिळाले आहे. हा पहिला धक्का. दुसरा धक्का सौम्य आहे, पण ही धक्काबुक्की टाळता आली असती. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनास केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. बंदी कायमची नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी आहे. मोदी यांच्यावरील ‘बायोपिक’ आता प्रदर्शित झाला तर मतदारांवर प्रभाव पडेल असा हल्लाबोल विरोधकांनी केला. हा त्यांचा आक्षेप तसा योग्य नाही. चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी मोदी यांचा प्रभाव आहेच, पण निवडणुकीत अशा चित्रपटांचे प्रदर्शन रोखणे हा आदर्श आचारसंहितेचाच भाग आहे. चित्रपटाबरोबर अचानक उगवलेल्या ‘नमो’ टीव्हीचे प्रसारणही निवडणूक आयोगाने थांबविले. मोदी यांच्या

प्रचारासाठी

स्वतंत्र ‘नमो’ टीव्हीची गरज होती की नव्हती हा भाजपचा विषय आहे, पण तसे पाहिले तर एखाद्दुसरे चॅनल वगळता सगळीच चॅनेल्स ही ‘नमो’मय बनली आहेत. मोदी यांची भाषणे व भूमिका अग्रक्रमाने दाखवण्यात येतात. भारतीय जनता पक्षाचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रभाव आहे व त्याचा फायदा होत असताना ऐन निवडणुकीत ‘मोदी’ चित्रपट प्रदर्शनाचा हट्ट व ‘नमो’ टीव्हीसारखे प्रयोग विरोधकांच्या डोळय़ांत खुपू शकतात हे लक्षात घेतले गेले असते तर बंदीहुकमाची नामुष्की टाळता आली असती. जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’ चित्रपटाचे भव्य प्रदर्शन जगभरात झाले. ‘ठाकरे’ चित्रपटास निवडणूक आचारसंहितेचा फटका बसू नये व हा चित्रपट फक्त निवडणूक प्रचारासाठी निर्माण केल्याची भावना होऊ नये ही आमची भूमिका होती. त्यामुळेच जानेवारी महिन्यात ‘ठाकरे’ प्रदर्शित झाला. ‘मोदी’ चित्रपटाबाबत हे करता आले असते व विरोधकांना आवरता आले असते, पण ‘चहापेक्षा किटली गरम’ हा प्रकार राजकीय पक्षात असल्याने भक्त आणि समर्थकांमुळे अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आव्हान याचिका स्वीकारणे, ‘मोदी’ चित्रपटावर बंदी व ‘नमो’ टीव्हीचे प्रसारण थांबविणे या तीन धक्क्यांनंतर भाजपला बसलेला चौथा धक्का महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत राडेबाजीचा होता. जळगावचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीचा मेळावा सुरू असतानाच

भाजपातील दोन प्रबळ गटांत

व्यासपीठावरच दंगल झाली. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व भाजपचे जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्यातील बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत व दंगलीत झाले. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने हे सर्व घडले व राडा सोडवायला मध्ये पडलेल्या महाजनांनाही दंगलीचा प्रसाद मिळाला. लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या या राडय़ाचे चित्रण बुधवारी संपूर्ण देशाने पाहिले व ते धक्कादायक होते. राजकारणात वाल्यांना घुसवून त्यांचे वाल्मीकी करण्यात आले, पण येथे तर भाजपचे जुनेजाणते तपस्वी वाल्मीकीच वाल्याच्या भूमिकेत शिरून दंगल घडवीत होते. महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारास लागलेले हे गालबोट नसले तरी ‘शिस्त’ हाच आत्मा असलेल्या भाजपसारख्या पक्षावर या घटनेनंतर खुलासे करीत बसण्याची वेळ आली आहे. अशा हाणामाऱ्यांना फक्त मतभेद म्हणून सोडून देता येणार नाही. लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण म्हणवून घेणे चुकीचे आहे. ‘‘Party with difference’’ असे म्हणणाऱया पक्षाला या हाणामाऱ्यांचे समर्थन करता येणार नाही. सत्तेमुळे शिस्तीचा बिघाडा होऊन काँग्रेसीकरण होणे हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. त्यात ‘मोदी’ चित्रपट, ‘नमो’ टीव्ही व जळगावच्या हाणामारीने अस्वस्थ केले. निदान राफेलबाबत तरी धसमुसळेपणा बंद करून संयमाने बोलणे गरजेचे आहे. संरक्षणमंत्र्यांपासून सगळेच ‘राफेल’ प्रकरणाचा निकाल येताच भांबावल्यासारखे बोलत आहेत. त्यामुळे अडचणीत वाढ होण्याचाच धोका आहे. त्यामुळे कमीत कमी बोला असा आमचा सल्ला आहे. बुधवारचे धक्के पचवून उभे राहावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

News Desk

राहुल गांधी यांची आज मुंबईत जाहीर सभा

News Desk

ठाण्यातील किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

Aprna