HW News Marathi
राजकारण

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

मुंबई | आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून व देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही राजकारण करण्यासाठी नाही. रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही. आमच्या धमन्यांत हिंदुपदपातशाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचे रक्त आहे. तेव्हा काहीही करून शिवसेनेस रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकारला विचारला आहे

सामनाचे आजचे संपादकीय

आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्या. तेव्हा काहीही करून शिवसेनेस रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? आमच्या अयोध्या यात्रेमुळे अनेकांच्या नाडीचे ठोके चुकले आहेत व अनेकांच्या नाड्या सुटल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगतोय, ‘ठाकरे’ अयोध्येत निघाले आहेत, पण मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा.

आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून व देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही राजकारण करण्यासाठी नाही. रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही. आमच्या धमन्यांत हिंदुपदपातशाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचे रक्त आहे. त्याच शिवरायांच्या जन्मस्थानातून, शिवनेरी किल्ल्यावरून मातीचा कलश घेऊन आम्ही अयोध्येत निघालो आहोत. मात्र त्यामुळे अनेकांच्या विजारी ढिल्या का पडाव्यात? अयोध्या मक्का-मदिनेत नसून आमच्या हिंदू भूमीतच आहे. त्यामुळे पासपोर्ट- व्हिसा वगैरेची काही लचांडं नाहीत. आम्ही ‘चलो अयोध्या’चा नारा दिलेला नाही तर रामदर्शनासाठी अयोध्येत निघालो आहोत असे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. मग तरीही हिंदुत्वाचे राजकारण करणार्‍यांची भगवी वस्त्रे चिंतेने पांढरी झाली असतील तर त्यांचे भगवेपण तपासून घ्यावे लागेल. अयोध्या ही कुणाची खासगी जागा नाही. अयोध्येत आता रामराज्य राहिले नसून सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आहे. पण 1992 सालात रामजन्मभूमीवरील

बाबराचे राज्य हातोड्याने उद्ध्वस्त

करण्याचे कार्य शेवटी बाळासाहेबांच्या वीर शिवसैनिकांनी पार पाडले. अशा शिवसैनिकांचे भय, द्वेष वगैरे वाटण्याऐवजी सध्याच्या राज्यकर्त्यांना अभिमानच वाटायला हवा. पण अयोध्येत इतक्या शिवसैनिकांचे काम काय, त्यांचा काही अंतस्थ हेतू वगैरे नाही ना अशा शंका उपस्थित का कराव्यात? तसे करण्यापेक्षा मेहेरबान सरकारने राममंदिर निर्माणाची तारीखच घोषित करून सगळ्या शंकाकुशंका शरयूच्या पात्रात कायमच्या बुडवून टाकाव्यात. एक श्रद्धाळू म्हणून आम्ही अयोध्येस जात आहोत. ज्या श्रद्धेने पंतप्रधान मोदी हे नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरात जातात, ज्या आस्थेने पंतप्रधान वाराणसीस गंगारतीस जातात, तितक्याच श्रद्धेने आम्ही अयोध्येत जात आहोत. महाराष्ट्राची भूमीसुद्धा संतसज्जनांबरोबर शूर वीरांची आहे. त्यामुळे एखाद्या स्थळाचे मांगल्य आणि पावित्र्य काय असते ते कोणी आम्हाला शिकवू नये. आम्ही जात आहोत त्याच दिवशी म्हणे अयोध्या परिसरात विश्व हिंदू परिषद, संघ परिवाराची ‘संतसभा’ आहे. आम्ही अयोध्येत पोहोचण्याचे ‘टायमिंग’ किंवा ‘मुहूर्त’ त्यांनी निवडला त्याबद्दल त्यांना विनम्र वंदन! म्हणजेच राममंदिरप्रश्नी आम्ही योग्य पावले टाकत आहोत व आम्ही अयोध्येत निघालो आहोत याच्या

ठिणग्या उडू लागल्या

आहेत. आता ‘ठाकरे’ अयोध्येत पोहोचत आहेत तर मग त्यांनी हे करू नये आणि ते करू नये असे मार्गदर्शन सुरू आहे. राममंदिर प्रश्नाची राजकीय संतरंजी ओढली जात असल्याचे हे भय आहे. मग आम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारीत आहोत, हे सर्व करण्यापेक्षा राममंदिर निर्माणाची तारीख जाहीर करून का टाकत नाही? आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे, कुणाचे मन, मेंदू भरकटला आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्या. तेव्हा काहीही करून शिवसेनेस रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? आमच्या अयोध्या यात्रेमुळे अनेकांच्या नाडीचे ठोके चुकले आहेत व अनेकांच्या नाड्या सुटल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगतोय, ‘ठाकरे’ अयोध्येत निघाले आहेत, पण मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण! – मुख्य निवडणूक अधिकारी

Aprna

महाराष्ट्रात आलेले पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते !

News Desk

आज शरद पवार घेणार सातारा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय

News Desk