HW News Marathi
राजकारण

बाजवा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंने केले मोदी सरकारला लक्ष

मुंबई | पाकिस्तानमधील सर्वच लष्करशहांनी भारताच्या मुळावर घाव घालण्याचे उद्योग केले आहेत. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख कमर बाजवा हे देखील त्याच विखारी आणि विषारी परंपरेचे पाईक आहेत. त्यामुळेच त्यांनी हिंदुस्थानचा बदला घेण्याची बांग दिल्याचे पहायला मिळत आहेत. पाकिस्तानचा इतिहासच नव्हे, तर भूगोलही बदलण्याचा निर्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाक लष्करशहा आणि राज्यकर्ते भारताचा बदला घेण्याच्या जाहीर धमक्या देतच राहणार. कमर बाजवा तेच करीत आहेत. त्यांचा ‘बाजा’ वाजवा. ५६ इंची निधडय़ा छातीचा दावा करणारे तो वाजवणार का? असा सवाल आजच्या सामनाच्या संपादकीय मधून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

पाकिस्तानातील नव्या सरकारचे ‘नऊ दिवस’ बहुधा संपत आले आहेत. त्या देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान हे कट्टर हिंदुस्थानद्वेष्टे म्हणून परिचित असले तरी अलीकडेच त्यांनी ‘हिंदुस्थानने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान दोन पावले पुढे टाकेल’ असा बुडबुडा तोंडदेखला का होईना, पण सोडला होता. मात्र आता पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हा बुडबुडा हवेतच फोडला आहे. हिंदुस्थानविरुद्ध नेहमीप्रमाणे गरळ ओकले आहे. ‘सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडत आहे त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल’, अशी दर्पोक्ती बाजवा यांनी केली आहे. तेवढय़ावरच त्यांची वळवळ थांबलेली नाही. कश्मीरमधील जनतेला आपला ‘सलाम’ असून कश्मिरी जनता खंबीरपणे हिंदुस्थानविरुद्ध लढा देत आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही ‘चाँदतारे’ या महाशयांनी तोडले आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुखांची अशी मुक्ताफळे नवीन नाहीत. पाकिस्तानात लष्करप्रमुख कोणीही असले तरी त्यांच्या तोंडून हिंदुस्थानद्वेषाचेच विष बाहेर पडते. हिंदुस्थानविरोधात ‘जंग’ हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. त्यामुळेच हिंदुस्थानविरुद्ध युद्धाच्या बेटकुळय़ा प्रत्येक पाकिस्तानी लष्करप्रमुख अधूनमधून फुगवत असतो. बाजवा हे या परंपरेला अपवाद ठरणाऱ्यांपैकी नाहीतच. किंबहुना, हिंदुस्थानद्वेष आणि कश्मीर प्रश्न याबाबतीत ते जास्त कडवे आहेत. त्यांनी जे गरळ ओकले आहे ते त्यामुळेच. एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. इम्रान खान यांनी उडविलेल्या

शांततेच्या कबुतराची ‘शिकार’

त्यांनी केली आणि त्याचवेळी विकास नव्हे, तर हिंदुस्थानद्वेष हाच पाकिस्तानचा मूलमंत्र राहणार हे पुन्हा दाखवले. पाकिस्तानची 30 कोटींची आर्थिक रसद दोन दिवसांपूर्वीच तोडणाऱ्या अमेरिकेलाही डिवचले आणि हिंदुस्थानलाही आव्हान दिले. इम्रान खान पंतप्रधानपदावरून पाक लष्कराचे बाहुले म्हणून काम करणार असे जे बोलले जात होते त्यावर बाजवा यांनी केलेले हे शिक्कामोर्तबच म्हणावे लागेल. अर्थात, पाक पंतप्रधानांनी चर्चा आणि शांततेची भाषा करायची आणि त्यांच्या लष्करप्रमुखांनी युद्धखोरीची खुमखुमी दाखवायची हा पाकिस्तानचा जुना खेळ आहे. इम्रान खान आणि बाजवा आता तेच करीत आहेत. मुळात शस्त्रसंधीचे एकतर्फी उल्लंघन करून सीमेपलीकडून अंदाधुंद गोळीबार पाकडे लष्करच करते. रमजान हा मुस्लिमांचा पवित्र महिना असल्याने हिंदुस्थानने पाक सैन्यच नव्हे, तर जम्मू-कश्मीरमधील पाकपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधातही बंदूक उचलायची नाही असा निर्णय घेतला. मात्र त्याला तसाच प्रतिसाद देण्याऐवजी पाकिस्तान त्याला ‘संधी’ समजला आणि सीमेवर शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरूच ठेवले. सीमेच्या आत दहशतवादी हल्ले घडवून आणले. त्यात आमच्या अनेक सैनिकांचे आणि निरपराध नागरिकांचे रक्त सांडले. तरीही पाकिस्तानी लष्करप्रमुख सीमेवरील पाक सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा उलटय़ा बोंबा मारत आहेत. पाकिस्तानची ही खुमखुमी आणि गुर्मी जगजाहीर आहे, पण हिंदुस्थानचे काय?

पाकडय़ांच्या ‘अरे’ला

आपण ‘का रे’ कधी करणार आहोत? हिंदुस्थानशी एक हजार वर्षं युद्ध करावे लागले तरी ते करू, असे म्हणणाऱ्या त्या देशाच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो असोत, त्यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो असोत, त्यांना फासावर लटकवून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झालेले झिया उल हक असोत किंवा ‘कारगील’ घडविणारे जनरल मुशर्रफ. पाकिस्तानच्या सर्वच लष्करशहांनी हिंदुस्थानच्या मुळावरच घाव घालण्याचे उद्योग केले. ‘इस्लामी बॉम्ब’च्या कल्पनेमागेही हिंदुस्थानद्वेषाचेच जहर होते. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख कमर बाजवा हे त्याच विखारी आणि विषारी परंपरेचे पाईक आहेत. त्यामुळेच त्यांनी हिंदुस्थानचा बदला घेण्याची बांग दिली आहे. पाकडय़ांचा फणा हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी वेळीच ठेचला नाही. चीन, पाकिस्तान आणि कश्मीरप्रश्नी पं. नेहरूंना ‘आरोपी’ ठरविणाऱ्या विद्यमान राज्यकर्त्यांनीही तत्कालीन पाक पंतप्रधानांशी ‘चाय पे चर्चा’ करून त्या सापाला दूध पाजण्याचेच उद्योग केले त्याचाच हा परिणाम आहे. पाकिस्तान तिकडून गोळीबार करतो, आपण इकडून शब्दांचे फुसके बार उडवतो. पाकिस्तान दहशतवादी हल्ले घडवून आणतो आपण फक्त इशारे-नगारे वाजवतो. पाकिस्तानचा इतिहासच नव्हे, तर भूगोलही बदलण्याचा निर्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाकडे लष्करशहा आणि राज्यकर्ते हिंदुस्थानचा बदला घेण्याच्या जाहीर धमक्या देतच राहणार. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख कमर बाजवा तेच करीत आहेत. त्यांचा ‘बाजा’ वाजवा. 56 इंची निधडय़ा छातीचा दावा करणारे तो वाजवणार का?

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता !

News Desk

पार्थ प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

swarit

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk