HW News Marathi
राजकारण

हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहचेल काय ?

मुंबई | कश्मिरी पंडितांचे दुःख, त्यांच्या वेदना याविषयी आजवर खूप लिहून आणि बोलून झाले. मात्र कश्मिरी पंडितांच्या व्यथा आजही आहे तशाच आहेत. कश्मिरी पंडितांची ही अवस्था पाहून केवळ हिंदुत्ववादीच नव्हे तर तमाम प्रखर राष्ट्रवादी जनतेची मान आजही शरमेने खाली झुकते. तथापि केंद्रातील विद्यमान सरकारला याची लाज वाटते काय, हा खरा प्रश्न आहे. ‘कश्मीर खोर्‍यात कश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र आणि हक्काची जागा द्या’ अशी आर्त हाक आता कश्मीरातून जोरजबरदस्तीने हाकलून दिलेल्या कश्मिरी पंडितांनी दिली आहे. सत्ता मिळताच समान नागरी कायदा, कश्मिरींचे फाजील लाड करणारे 370 कलम रद्द करणे, अयोध्येत राममंदिर उभारणे आणि कश्मिरी पंडितांना पुन्हा खोर्‍यात नेऊन वसवणे हा सगळा अजेंडाच भाजपने गुंडाळून ठेवला. ‘हक्काची जागा द्या’ असा टाहो आता कश्मिरी पंडितांनी फोडला आहे. हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहचेल काय?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजप सरकारला केला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

बंदुकीच्या जोरावर इस्लामी दहशतवादी क्रूर अत्याचार करत असताना 7 लाख 50 हजार पंडितांनी जीव मुठीत धरून कश्मीर सोडले. त्यालाही आता 30 वर्षे उलटली. देशात आज हिंदुत्ववाद्यांचे बहुमताचे सरकार आहे. तरीही कश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टा संपू नयेत ही राष्ट्रीय शरमेचीच गोष्ट आहे. ‘हक्काची जागा द्या’ असा टाहो आता कश्मिरी पंडितांनी फोडला आहे. हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहोचेल काय?

कश्मिरी पंडितांचे दुःख, त्यांच्या वेदना याविषयी आजवर खूप लिहून आणि बोलून झाले. मात्र कश्मिरी पंडितांच्या व्यथा आजही आहे तशाच आहेत. कश्मिरी पंडितांची ही अवस्था पाहून केवळ हिंदुत्ववादीच नव्हे तर तमाम प्रखर राष्ट्रवादी जनतेची मान आजही शरमेने खाली झुकते. तथापि केंद्रातील विद्यमान सरकारला याची लाज वाटते काय, हा खरा प्रश्न आहे. ‘कश्मीर खोर्‍यात कश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र आणि हक्काची जागा द्या’ अशी आर्त हाक आता कश्मीरातून जोरजबरदस्तीने हाकलून दिलेल्या कश्मिरी पंडितांनी दिली आहे. कश्मिरी पंडितांना हक्काची जागा देतानाच या जागेला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जाही दिला जावा अशी मागणी कश्मिरी पंडितांच्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेने केली आहे. देशात हिंदुत्ववाद्यांची राजवट असतानाही कश्मीरातून बेदखल केलेल्या पंडितांना हक्काच्या जागेसाठी सरकारला साकडे घालावे लागते, हेच मुळात संतापजनक आहे. ‘पनून कश्मीर’ने केलेली मागणी हे त्याचेच द्योतक आहे. अनेक सरकारे आली आणि गेली; पण कधी काळी कश्मीरचे ‘मालक’ असणार्‍या पंडितांच्या नशिबी आलेले भिकार्‍याचे जीणे काही बदलले नाही. काँग्रेजी सरकारांच्या राजवटीत कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून वर्षानुवर्षे रान उठवणार्‍या भारतीय जनता पक्षाचे आज केंद्रात सरकार आहे. तथापि कश्मिरी पंडित मात्र आजही दहा बाय दहाच्या निर्वासित छावण्यांमध्येच विपन्नावस्थेत जगतो आहे. मग सरकार बदलून उपयोग तरी काय झाला? पाकिस्तानच्या पाठिंब्यावर कश्मीर खोर्‍यातील मुस्लिमांनी पंडितांवर केलेले

अनन्वित अत्याचार

आणि त्यांची घडविलेली हत्याकांडे इथपासून ते कश्मिरी पंडितांना खोर्‍यातून पळून जाण्यास भाग पाडणार्‍या करुण कहाण्या वाचल्या तर आजही अंगावर काटा येतो. या भयंकर अत्याचारानंतर कश्मिरी पंडितांना आपली घरे-दारे सोडून आपल्याच देशात विस्थापित व्हावे लागण्याच्या घटनेला पुढच्या महिन्यात 30 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘पनून कश्मीर’ने केंद्रीय सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. कश्मीर खोर्‍याचे विभाजन करा, झेलम नदीच्या उत्तर आणि पूर्व भागास खोर्‍यातून तोडून तिथे कश्मिरी पंडितांचे स्वतंत्र राज्य स्थापन करा आणि त्यास केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्या, जम्मूचे स्वतंत्र राज्य करा आणि लडाखलाही कश्मीर खोर्‍यातून अलग करून तोही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशा या प्रमुख मागण्या आहेत. इस्लामी दहशतवादामुळे कश्मीर खोर्‍यातून लाखो कश्मिरी पंडितांना बेघर व्हावे लागले ही सार्वभौम हिंदुस्थानवर झालेली सर्वात मोठी जखम आहे. दुर्दैव असे की, गेल्या 30 वर्षांत कश्मिरी पंडितांच्या अश्रूंसह झेलमचे पाणी पाकिस्तानात वाहून गेल्यानंतरही ही जखम आजही भळभळतीच आहे. देशातील नवीन पिढीला तर कश्मिरी पंडितांची मूळ समस्याही कदाचित ठाऊक नसेल. कश्मीर खोर्‍याचे संपूर्ण इस्लामीकरण करण्यासाठी 1989 च्या डिसेंबर महिन्यापासून 1995 पर्यंत सलग सहा वर्षे कश्मिरी पंडितांचे, तेथील हिंदू व शिखांचे भयंकर शिरकाण झाले. या हत्याकांडात 6 हजार कश्मिरी पंडित मारले गेले. ‘तुमच्या स्त्रिया आणि मालमत्ता सोडून चालते व्हा’ अशी पत्रके

पंडितांच्या घरांवर

चिकटवण्यात आली होती. असंख्य हिंदू पंडितांच्या स्त्रियांवर त्यांच्या कुटुंबासमोरच बलात्कार करण्यात आले. बंदुकीच्या जोरावर इस्लामी दहशतवादी क्रूर अत्याचार करत असताना 7 लाख 50 हजार पंडितांनी जीव मुठीत धरून कश्मीर सोडले. कश्मिरी मुस्लिमांनी व अतिरेक्यांनी दीड हजार मंदिरे उद्ध्वस्त केली. कश्मिरी पंडितांच्या सहाशे गावांची नावे बदलून त्यांना इस्लामी नावे देण्यात आली. आपल्याच देशात आपले घरदार, सफरचंदाच्या बागा, मालमत्ता आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे कश्मीर सोडून हिंदू पंडितांना कायमचे परागंदा व्हावे लागले. हा सगळा अमानुष नरसंहार आपला देश हताशपणे बघत राहिला. या राक्षसी अत्याचारानंतर कश्मिरी पंडितांच्या नशिबी आल्या त्या फक्त नरकयातना. त्यालाही आता 30 वर्षे उलटली. देशात आज हिंदुत्ववाद्यांचे बहुमताचे सरकार आहे. तरीही कश्मिरी पंडितांच्या हालअपेष्टा संपू नयेत ही राष्ट्रीय शरमेचीच गोष्ट आहे. जे मुद्दे घेऊन भाजपने आपले राजकीय बस्तान बसवले त्यात कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही होताच. मात्र सत्ता मिळताच समान नागरी कायदा, कश्मिरींचे फाजील लाड करणारे 370 कलम रद्द करणे, अयोध्येत राममंदिर उभारणे आणि कश्मिरी पंडितांना पुन्हा खोर्‍यात नेऊन वसवणे हा सगळा अजेंडाच भाजपने गुंडाळून ठेवला. ‘हक्काची जागा द्या’ असा टाहो आता कश्मिरी पंडितांनी फोडला आहे. हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहचेल काय?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…उद्धव ठाकरेंचे अस्तित्व संपले”, नारायण राणेंची बोचरी टीका

Aprna

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

swarit

उद्धव ठाकरेंचे भाषण समजावून सांगणाऱ्याला मनसेकडून बक्षीस जाहीर

News Desk