HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

प्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का ? मिलिंद देवरा यांचा सवाल

मुंबई | “भाजपने उमेदवारी दिलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे. ज्या पोलीसांनी मुंबईकरांचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली, जे पोलीस अहोरात्र मुंबईकरांचे रक्षण करतात त्यांच्याबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य करुन भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. मुंबईचे अवमान करणाऱ्या या सर्व प्रकरणाबाबत शिवसेना सत्तेसाठी शांत बसली आहे का ?”, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सध्या जामिनावर असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीतर्फे भोपाळ येथून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या एटीएसचे माजी संचालक हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले होते. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांना दहशतवाद्यांनी मारल्याने माझे सुतक संपले. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळे झाला, असे खळबळजनक विधान करुन प्रज्ञा सिंह यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर हल्लाबोल चढविला आहे. “मुंबई पोलीस हे मुंबईकरांचा अभिमान आहे. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य मुंबईकर कधीही सहन करणार नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेले वक्तव्याचा मी स्पष्टपणे निषेध करतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद हेमंत करकरेंच्या नावावर राजकारण खेळणे म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे. मुंबईवर केल्या गेलेल्या हया अपमानावर शिवसेना शांत का आहे ?”, असा सवाल मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला आहे. यातून शिवसेनेचे मुंबईवरील प्रेम दिसून येत असल्याची टीका करताना याचे उत्तर मुंबईकर निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

महिला सबलीकरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार पवारांनी गमावला !

News Desk

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…भिवंडी मतदारसंघाबाबत

News Desk