HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

चीनविरुद्ध सारे जग हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम !

मुंबई । पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी अमेरिकेने पुन्हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव मांडला आहे. ब्रिटन आणि फ्रान्सकडून या प्रस्तावास पाठिंबा देखील मिळाला आहे. १५ दिवसांपूर्वी देखील हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांपुढे मांडण्यात आला होता. मात्र, त्यावेळी चीनने व्हिटो पॉवर म्हणजेच नकाराधिकाराचा वापर केला होता. याच पार्श्वभूमीवर आज (२९ मार्च) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये चीनविरुद्ध सारे जग हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

चीनच्या दुटप्पी ढोंगावर हल्ला चढवून अमेरिकेने जैश व मसूदला काळ्या यादीत टाकण्याचा नवा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत आणला आहे. त्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये जो काय तणाव निर्माण व्हायचा तो होईल, पण दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक जनमत आपल्या बाजूने वळविण्यात हिंदुस्थान सरकारला यश आले आहे, हे मान्य करावेच लागेल. चीनविरुद्ध सारे जग हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे.

पुलवामा हत्याकांडाचा सूत्रधार मौलाना मसूद अजहरला वाचविणाऱया चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्याचे डावपेच आता यशस्वी होताना दिसत आहेत. सगळ्य़ा जगाच्या विरुद्ध जाऊन चीनने दहशतवाद आणि जैश-ए-मोहंमद या कुख्यात अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचे वकीलपत्र घेतले. मसूदला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्याच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गात काटे अंथरण्याचे काम चीनने केले. पाकिस्तानवरील प्रेमापोटी चीनने दहशतवादासारख्या जगभरासाठी धोकादायक बनलेल्या विषयावरून जे गलिच्छ राजकारण चालवले आहे, त्यावरून आंतरराष्ट्रीय जनमानस संतप्त झाले आहे. जगभरातील देश चीनविरुद्ध एकवटत चालले आहेत. हिंदुस्थान सरकारने जागतिक समुदायाला सोबत घेऊन चीनचा खरा चेहरा बेनकाब केल्यानंतर सारेच प्रमुख देश आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनला घेरण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आज तरी दिसते आहे. अमेरिकेने तर मौलाना मसूद अजहरच्या मुद्द्यावरून चीनशी खुलेआम टक्कर घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. मसूद अजहरसारख्या अतिरेक्याची ढाल बनून त्याला संरक्षण देऊ नका, अशा शब्दांत अमेरिकेने चीनला खडसावले आहे. एकीकडे चीन आपल्या देशातील मुसलमानांवर भयंकर अत्याचार करतो, त्यांचा अमानुष छळ करतो आणि दुसरीकडे पाकिस्तानातील

मसूद अजहरसारख्या दहशतवाद्याला

पाठीशी घालतो. हा दुटप्पीपणा चीनने थांबवावा, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांनी जाहीरपणे ट्विट करून चीनला सुनावले आहे. अमेरिका एवढय़ावरच थांबली नाही. पुलवामा हत्याकांडात हिंदुस्थानच्या 40 जवानांचे बळी घेणाऱया जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करून मसूद व त्याच्या संघटनेवर जागतिक पातळीवर बंदी आणावी, असा प्रस्तावच अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नव्याने दाखल केला आहे. या प्रस्तावात अमेरिकेने पुलवामा हत्याकांडाची कठोर शब्दांत निर्भर्त्सना तर केली आहेच, शिवाय अल-कायदा आणि इसिस यांच्याप्रमाणेच जैश ए मोहंमदवर बंदी घालून मसूद व त्याच्या संघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीत टाकावे, अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेने या प्रस्तावाच्या मसुद्यात मांडली आहे. अमेरिकेने बुधवारी दाखल केलेल्या या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटन या सुरक्षा परिषदेतील दोन देशांनी लगोलग पाठिंबा देऊन चीनवरील दबाव वाढवला आहे. चीनने आतापर्यंत चार वेळा सुरक्षा परिषदेत ‘व्हेटो’चा वापर करून मसूदला जागतिक दहशतवादी ठरविण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. मात्र आता अमेरिकेने ‘जैश’वर

बंदी व काळ्या यादीत

टाकण्याचा थेट प्रस्ताव आणून चीनला सरळसरळ शिंगावर घेण्याची आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. जैश आणि मसूदच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष उडणार हे उघड आहे. सुरक्षा परिषदेत या मुद्दय़ावर नव्याने चर्चा आणि मतदान होईल. त्या आधी जगभरातील देशांद्वारे चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू होईल, तेव्हा निश्चितच चीनचा तीळपापड होईल. चीनने अलीकडेच आपल्या देशातील इस्लामी दहशतवाद्यांच्या दीड हजार टोळ्या संपविल्याची आणि 13 हजार अतिरेक्यांना अटक केल्याची माहिती जाहीर केली होती. प्रत्यक्षात 20 लाखांहून अधिक उईगर वंशाचे मुस्लिम चिनी छळछावण्यांमध्ये खितपत पडले आहेत. आपल्या देशातील निपराध मुस्लिमांचा अमानुष छळ करणारा चीन पुलवामा हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या मसूद अजहरला मात्र दहशतवादी मानायला तयार नाही. चीनच्या याच दुटप्पी ढोंगावर हल्ला चढवून अमेरिकेने जैश व मसूदला काळ्य़ा यादीत टाकण्याचा नवा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत आणला आहे. त्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये जो काय तणाव निर्माण व्हायचा तो होईल, पण दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक जनमत आपल्या बाजूने वळविण्यात हिंदुस्थान सरकारला यश आले आहे, हे मान्य करावेच लागेल. चीनविरुद्ध सारे जग हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम आहे.

Related posts

राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची नियुक्ती

News Desk

ज्यांना बोंबलायचे, त्यांनी खुशाल बोंबलावे !

News Desk

वनगांची उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत

News Desk