सोलापूर – मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथे पिता- पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. पित्याने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना येथे घडली. या नराधम पित्याने मुलाचा मृतदेह शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. शेतजमिनीच्या वाटणीवरून घडलेल्या यागुन्ह्य़ात मृताच्या सावत्र आईसह सावत्र भाऊ व सावत्र मामा आदी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास अप्पासाहेब पाटील (४२) असे खून झालेल्या पुरूषाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताचे वडील अप्पासाहेब बाबूराव पाटील व सावत्र आई शेषाबाई पाटील यांच्यासह सावत्र भाऊ विवेकानंद, त्याची पत्नी पल्लवी तसेच सावत्र मामा भगवान विट्ठल खडके व विष्णू विट्ठल खडके (रा. धर्मराग) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
४ ऑगस्ट रोजी सुहास घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार अप्पासाहेब पाटील यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार पोलीस तपास सुरू असतानाच मृत सुहास यांचे मामा शिवाजी भगवान पाटील ऊर्फ निचरे (वय रा. ४४, रा. वाघोली, ता. मोहोळ) हे धर्मगाव येथे गेले होते. मेव्हणे अप्पासाहेब पाटील यांच्या शेतात फिरत असताना एकेठिकाणी जमीन दाबलेली दिसून आल्याने निचरे यांना संशय आला. त्यांनी ही बाब मंगळवेढा पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी तहसीलदारांमार्फत जागेचा पंचनामा करीत जमीन खोदली असता त्यात सुहास पाटील याचा मृतदेह आढळून आला, हे कृत्य दुसरे कोणी नाही तर दस्तुरखुद्द सुहासच्या वडिलांनीच दुसऱ्या पत्नी व इतरांच्या साह्य़ाने केल्याचे उजेडात आले.
पाटील कुटुंबीयांत वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी करण्यावरून वाद होता, त्यातूनच सावत्र आईसह सावत्र भाऊ व इतरांनी सुहास याचा काटा काढण्यास वडील अप्पासाहेब पाटील यांना फितविले. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.