HW News Marathi
महाराष्ट्र

पंडित बिरजू महाराज निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली

मुंबई | प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालं. रविवारी (१६ जानेवारी) रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांचे नातू स्वारांश मिश्रा यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनानंतर कला क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बिरजू महाराज यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

‘नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराज म्हणजे नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, ‘कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांचे नृत्य आणि संगीत क्षेत्रातील योगदान अमूल्य असे आहे. त्यांनी भारतीय कलेचे वैभव सातासमुद्रापार नेले. कला क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा मानदंड निर्माण केला. नृत्य, संगीत हेच त्यांचे आयुष्य होते. ते सर्जक कला उपासक होते. त्यांचे कलारसिकांच्या हृदयातील स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहील. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना विनम्र श्रध्दांजली’.

‘देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला’ – अजित पवार

“प्रसिद्ध कथ्थक नृत्यकलावंत, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज हे भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्यक्षेत्रातलं स्वतंत्र विद्यापीठ होते. तरुण कलावंतांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडविल्या, त्यांच्यासाठी मार्गदर्शक, दीपस्तंभाचं काम केलं. कथ्थक नृत्यकलेला देशात, सातासमुद्रापार लोकप्रियता मिळवून दिली. कोट्यवधी रसिकांना मनमुराद आनंद दिला. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या पंडित बिरजू महाराजांना आदर, मान-सन्मान, लोकप्रियता मिळवून देण्याचं काम महाराष्ट्रानं सातत्यानं केलं. महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता बाळगणारे, पश्चिम बंगालला आई, महाराष्ट्राला वडील मानणारे ते कलावंत होते. पंडितजींच्या निधनानं देशानं महान कलावंत, महाराष्ट्रानं सांस्कृतिक राजदूत गमावला आहे. पंडितजींच्या कुटुंबियांच्या, त्यांच्या कोट्यवधी रसिकांच्या दु:खात मी देखील सहभागी आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 3 रुपये 50 पैशांची वाढ

Aprna

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार! – मुख्यमंत्री

News Desk

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील, संजय राऊतांचा दावा

News Desk