मुंबई | “उद्या कॅबिनेटची बैठक आहे. ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे,” असा खोचक टोलाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांना लगावला आहे. विदर्भ – मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (2 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, “शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. उद्या कॅबिनेटची बैठक आहे. ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे,” असा खोचक टोलाही अजित पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला. यावेळी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.
यावेळी अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्र सरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते. त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही, असेही अजित पवार म्हणाले.
विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे तिकडे लक्ष दिला पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने होत नाही, असा चिमटाही अजित पवार यांनी काढला. मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातंच दिलेलं नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्री यांना अधिकारच दिलेला नाही. राज्य सरकारचे अधिकार गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे, असेही अजित पवार म्हणाले.
कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.
मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. दहानंतर सभा घेत नाही तो एक नियम आहे हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत तर पोलीस अधीक्षक काय करणार. अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील तर काय करणार असा उद्विग्न सवालही अजित पवार यांनी केला.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे एकंदरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री इतर व्यापात आहेत मार्गदर्शन आणि दर्शन घेत आहेत. चर्चा करत आहेत. मात्र त्याआधी १३ कोटी जनतेचे तुम्ही प्रतिनिधित्व करता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत त्याकडे लक्ष द्या असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
मुख्यमंत्री यांच्याकडे याअगोदर अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तिथे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. शिवाय अतिवृष्टीग्रस्त भागामधील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. राज्यातील विकासकामांना स्थगिती दिल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दल चीड निर्माण झाली आहे त्यामुळे विकासकामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी अशीही मागणी अजित पवार यांनी केली.
भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्यसरकार काय पाऊले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामण या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे स्टेटमेंट वाचले मात्र सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल. तेलाच्या किमती कमी आहेत हे मान्य करायला हवे परंतु इतर वस्तूंच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. २०१६ मध्ये नोटबंदी झाली त्यावेळी कॅशलेसचा आभास निर्माण केला गेला व काळा पैसा बाहेर येईल असे सांगण्यात आले परंतु तसे झाले नाही. अद्याप आरबीआयने किती नकली नोटा मिळाल्या हे सांगितलेले नाही. दोन हजारच्या नोटा डम करण्यात आल्या आहेत अशी चर्चा आहे. ते शोधण्याचे काम केंद्रीय यंत्रणांनी करावे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले. कुणी कितीही काही म्हटले तरी जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे असेही अजित पवार जेपी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.