पुणे | अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला. काल (मंगळवार, 13 सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली असून ५ सप्टेंबरपासून आतापर्यंत नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे.
कारखान्यावर छापा टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करुन बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम्ड मिल्क पावडर व पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत २ लाख ३९ हजार ८०० रूपये किंमतीचे १ हजार १९९ किलो पनीर, १८ लाख ७१ हजार ६५२ रूपये किंमतीचे ४ हजार ७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ लाख ५३ हजार ६७५ रूपये किंमतीचे १ हजार ४८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण २२ लाख ६५ हजार २१७ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात व सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.