HW News Marathi
महाराष्ट्र

समन्वयातून सीमावाद सोडवावा! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी (१४ डिसेंबर) महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले.

केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर महाराष्ट्र लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी या प्रकरणात संवेदनशीलपणा दाखवून मध्यस्थी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

केंद्रीय गृहमंत्री यांनी संसद परिसरातील ग्रंथालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शाह पुढे म्हणाले, सीमावाद प्रश्न हा संवैधानिकरित्या सोडविला पाहिजे. सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत आरोप – प्रत्यारोप करु नयेत. दोन्ही राज्यांनी तीन-तीन मंत्री नेमून ज्या भागात सीमावादावरून तणाव आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करावा. यासह कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती नेमावी.

सीमावादावर अलीकडच्या काही दिवसात सामाजिक माध्यमांतून गैरसमज पसरविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे. विशेषत: फेक (बनावट) ट्विटरच्या माध्यमातून अधिक प्रमाणात  गैरसमज पसरविले गेले आहेत. यापुढे अशा फेक ट्विटर खात्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सर्व राजकीय पक्षांनी सीमावादाचा प्रश्न चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे  विनंतीपूर्वक आवाहन केंद्रीय गृहमंत्री यांनी यावेळी केले.

Related posts

“कॉंग्रेस कोणीही संपवू शकत नाही” – धवलसिंह मोहिते पाटील

News Desk

मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश…!

News Desk

फडणवीस अहंकारी,लबाड,दगलबाज ! फडणवीसांच्या प्रकरणांची जथ्थी बाहेर काढू …

News Desk