नागपूर । नवीन प्रशासकीय इमारत ‘वनभवन’चा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज (१८ डिसेंबर) दुपारी १ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नवीन प्रशासकीय इमारत वनभवन ही ‘झिरो माईल’ परिसरामध्ये असून या इमारतीमध्ये वनविभागाची एकूण 14 कार्यालये आहेत. त्यात एकूण 254 अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व यांच्या अधिनस्त सर्व कार्यालये, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), वनसंरक्षक (कार्य आयोजन व सामाजिक वनीकरण), उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग, उपवनसंरक्षक (कार्य आयोजन) व विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) ही कार्यालये आहेत.
नागपूर वनवृत्तामधील भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्याबरोबरच अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरातून नागपूर मुख्यालयाच्या ठिकाणी क्षेत्रीय कामाबाबत किंवा सामाजिक वनीकरण व वन्यजीव या विविध विभागाशी कोणत्याही प्रश्नांशी निगडीत काम असल्यास, काही मदत हवी असल्यास, शेतकरी किंवा सामान्य नागरिक या इमारतीमध्ये आल्यानंतर त्याला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागणार नाही. त्याचबरोबर या इमारतीच्या कार्य कक्षेबाहेरील निर्णय घेण्यासाठीचा प्रश्न निर्माण झाल्यास रामगिरी रोडवरील मुख्य इमारतीमधील कार्यालयात त्याला समन्वय साधण्यास व त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यास या इमारतीतील कार्यालयाची भूमिका मोठी राहणार आहे. या इमारतीचे बांधकाम हे हरितगृह संकल्पनेवर आधारित आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे वनसेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनसेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक वितरण समारंभ पार पडेल. यामध्ये वन्यजीव संरक्षण व्यवस्थापन, उत्पादन, विस्तार, नावीन्यपूर्ण, धाडसी कार्य केलेल्या एकूण 53 वन अधिकारी कर्मचा-यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाल रेड्डी व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॅा. वाय.एल.पी.राव यावेळी उपस्थित असतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.