मुंबई | संपूर्ण देशात सध्या पॅगाससचं प्रकरण गाजत आहे. याच प्रकरणावर कॉंग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. थोरात म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅप झाल्याचा दावा राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी केल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. यावरच महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा दावा थोरातांनी केला आहे. “नाना पटोले यांचेही फोन २०१७-१८ मध्ये टॅप झाले होते. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. कारण यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते”.
१२ आमदारांची नियुक्ती तातडीने करावी
१२ आमदारांबाबत राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या 12 आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते. याबाबत हायकोर्टापुढे विषय चालू आहे. पण कोर्टात जाण्याची वेळ येणं हेही दुर्दैव आहे. माननीय राज्यपालांना हा निर्णय लवकर देणे उचित राहील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव, थोरातांचा आरोप
मुंबई विमानतळाचा कारभार अहमदाबादला हलवण्याचा प्रकार सुरु आहे. याबाबत थोरात म्हणाले की, “२०१४ नंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला कशा नेता येतील हा प्रयत्न सुरू आहे. असं केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. उद्योगांसाठी अजूनही महाराष्ट्राचं आकर्षण आहे. राज्यातील वातावरण, सुरक्षितता, यामुळे उद्योग आपल्याकडे येतात”.
ओबीसी डाटा
केंद्र सरकारकडे हा डाटा आहे, ती जनगणना मिळावी यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे, पण तो डाटा सहज मिळावा असं वाटतं. तो मिळाला नाही तर राज्य मागासवर्ग आयोगातर्फे हे काम सुरू आहे, असं थोरातांनी सांगितलं आहे.
‘पेगॅसस’ काय आहे?
जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.